फक्त 1 हिट चित्रपट देणारा अभिनेता, आज 1500 कोटींचा मालक, शाहरुख-सलमानसोबत केलं काम
या अभिनेत्याने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत दिला फक्त 1 हिट चित्रपट, आज तोच अभिनेता आहे 1500 कोटींचा मालक. शाहरुख-सलमानसोबत केलंय काम.

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर यश मिळवले तर काही कलाकारांना मोठ्या फिल्मी घराण्याचा वारसा असूनही अपेक्षित यश मिळाले नाही. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेता जायद खान. संपूर्ण कारकिर्दीत केवळ एकच सुपरहिट चित्रपट देऊनही जायद खान आज कोट्यवधींच्या नाही तर हजारो कोटी रुपयांच्या संपत्तीमुळे चर्चेत आहे. आज, 5 जुलै रोजी तो आपला 46 वा वाढदिवस साजरा करत आहे.
जायद खानचा जन्म 5 जुलै 1980 रोजी अभिनेते आणि निर्माते संजय खान तसेच दिवंगत अभिनेत्री जरीन खान यांच्या घरी झाला. त्याला लहानपणापासूनच चित्रपटसृष्टीचे वातावरण लाभले. दिवंगत अभिनेते फिरोज खान हे त्याचे काका होते तर अभिनेता फरदीन खान हा त्याचा चुलत भाऊ आहे.
वयाच्या 23 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण
जायद खानने 2003 मध्ये, वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी ‘चुरा लिया है तुमने’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष यशस्वी ठरला नाही.
2004-05 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मैं हूँ ना’ या चित्रपटामुळे जायद खानला मोठी ओळख मिळाली. या चित्रपटात त्याने बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानसोबत काम केले होते. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले आणि जायदच्या कारकिर्दीतील हा एकमेव सुपरहिट चित्रपट ठरला.
वैयक्तिक आयुष्य
जायद खानने 2006 मध्ये मलायका पारेख यांच्याशी विवाह केला. या दाम्पत्याला आरिज आणि जिदान अशी दोन मुले आहेत. जायद आपल्या कुटुंबासोबत आनंदी वैवाहिक आयुष्य जगत असून चित्रपटसृष्टीपासून काहीसा दूर आहे.
एका वृत्तानुसार, जायद खानची एकूण संपत्ती सुमारे 1500 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. 2024 मध्ये एका मुलाखतीदरम्यान त्याच्या संपत्तीबाबत प्रश्न विचारण्यात आला असता त्याने केवळ स्मितहास्य केले. त्याने या आकड्याची ना पुष्टी केली, ना त्याचे खंडन केले.
बॉलिवूडमध्ये केवळ एका हिट चित्रपटामुळे ओळख निर्माण करणारा जायद खान आज अभिनयापेक्षा त्याच्या व्यावसायिक यशामुळे अधिक चर्चेत आहे. चित्रपटसृष्टीत अपेक्षित स्थान मिळाले नसले तरी योग्य गुंतवणूक आणि व्यवसायाच्या माध्यमातून त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
