महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ‘या’ लक्षवेधी लढती

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 'या' लक्षवेधी लढती

मुंबई : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान उद्या (11 एप्रिल) पार पडणार आहे. देशातील 20 राज्यांमधील 91 मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील 7 मतदारसंघांचा यात समावेश आहे. वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ वाशिम या सात मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान होणार असून, नागपुरातील ‘गडकरी विरुद्ध पटोले’ लढत सर्वात लक्षवेधी मानली जात आहे. मात्र, […]

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:04 PM

मुंबई : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान उद्या (11 एप्रिल) पार पडणार आहे. देशातील 20 राज्यांमधील 91 मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील 7 मतदारसंघांचा यात समावेश आहे. वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ वाशिम या सात मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान होणार असून, नागपुरातील ‘गडकरी विरुद्ध पटोले’ लढत सर्वात लक्षवेधी मानली जात आहे. मात्र, त्याचसोबत इतर सहा मतदारसंघांमध्येही चुरशीच्या लढती आहेत. या सर्व लढतींवर एक नजर टाकूया :

वर्धा लोकसभा मतदारसंघ

वर्ध्यात काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारासह वंचित बहुजन विकास आघाडीचा उमेदवारही तुल्यबल असल्याने इथली लढतही चुरशीची ठरणार आहे. भाजपकडून विद्यमान खासदार रामदास तडस, काँग्रेसकडून चारुलता टोकस आणि वंचित बहुजन आघाडीकडून धनराज वंजारी रिंगणात आहेत.

 • रामदास तडस – भाजप
 • चारुलता टोकस – काँग्रेस
 • धनराज वंजारी – वंचित बहुनज आघाडी

रामटेक लोकसभा मतदारसंघ

शिवसेनेचे विद्यमान खासदार कृपाल तुमाणे हे पुन्हा एकदा युतीकडून रामटेकमधून लढत आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवार ताकदवान नसल्याने शिवसेनेला रामटेकची जागा सोपी जाते. मात्र, यंदा काँग्रेसकडून किशोर गजभिये आणि वंचित बहुजन आघाडीकडून किरण रोडगे-पाटणकर रिंगणात असल्याने रामटेकमध्ये यंदा कोण बाजी मारतंय, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

 • कृपाल तुमाणे – शिवसेना
 • किशोर गजभिये – काँग्रेस
 • किरण रोडगे-पाटणकर – वंचित बहुजन आघाडी

(सर्व लाईव्ह अपडेटसाठी लॉग ऑन करा : www.tv9marathi.com)

नागपूर लोकसभा मतदारसंघ

पहिल्या टप्प्यातील सर्वात लक्षवेधी लढत म्हणून नागपूर लोकसभा मतदारसंघाकडे पाहिले जात आहे. भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या पारंपरिक नागपूर लोकसभा मतदारसंघातून लढत आहेत. नेहमीच सोपी असणारी ही निवडणूक यंदा मात्र त्यांच्यासाठी आव्हानात्मक झाली आहे. कारण भाजपचेच माजी खासदार आणि आता काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले हे गडकरींना आव्हान देत आहेत. मूळचे भंडारा-गोंदियातील असलेले नाना पटोले नागपुरात येऊन गडकरींना किती आव्हान देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 • नितीन गडकरी – भाजप
 • नाना पटोले – काँग्रेस

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ

भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस-राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदारसंघ असला, तरी 2014 साली नाना पटोलेंनी भाजपमध्ये प्रवेश करुन, राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता. मात्र, त्यानंतर विविध मुद्द्यांवरुन मोदी सरकारवर नाराज होत, नाना पटोले यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, नाना पटोले या मतदारसंघातून लढण्याऐवजी नागपुरातून गडकरींविरोधात लढत आहेत. त्यामुळे आघाडीकडून इथून नाना पंचबुद्धे रिंगणात आहेत. तर सुनील मेढें हे भाजपकडून लढत आहेत.

 • सुनील मेंढे – भाजप
 • नाना पंचबुद्धे – राष्ट्रवादी
 • एन. के. नान्हे – वंचित बहुजन आघाडी

(सर्व लाईव्ह अपडेटसाठी लॉग ऑन करा : www.tv9marathi.com)

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ

भाजपकडून अशोक नेते, काँग्रेसकडून नामदेव उसेंडी आणि वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. रमेश गजबे हे गडचिरोली-चिमूरमधून रिंगणात आहेत. याच तिघांमध्ये मुख्य लढत असेल. त्यातही अशोक नेते हे विद्यमान खासदार असल्याने काँग्रेसमच्या नामदेव उसेंडी यांच्यासमोर आव्हान असेल.

 • अशोक नेते – भाजप
 • नामदेव उसेंडी – काँग्रेस
 • डॉ. रमेश गजबे – वंचित बहुजन आघाडी

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ

केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर हे चंद्रपूरचे विद्यमान खासदार आहेत. मात्र, यंदा अहीर यांच्यासाठी निवडणूक अत्यंत आव्हानात्मक ठरणार आहे. याचं कारण शिवसेनेचे आमदार सुरेश धानोरकर उर्फ बाळू धानोरकर हे रिंगणात आहेत. त्यामुळे चंद्रपूरची लढत अत्यंत चुरशीची होणार आहे.

 • हंसराज अहीर – भाजप
 • बाळू धानोरकर – शिवसेना
 • अॅड. राजेंद्र महाडोळे – वंचित बहुजन आघाडी

(सर्व लाईव्ह अपडेटसाठी लॉग ऑन करा : www.tv9marathi.com)

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ

शिवसेनेच्या भावना गवळी या यवतमाळ-वाशिममधून विद्यमान खासदार आहेत. मात्र, यंदा यवतमाळमध्ये तिरंगी लढत होणार आहे. कारण काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे इथून लढत आहेत. तर बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेकडून वैशाली येडे आणि वंचित बहुजन आघाडीकडून प्रा. प्रवीण पवार हेसुद्धा रिंगणात आहेत.

 • भावना गवळी – शिवसेना
 • माणिकराव ठाकरे – काँग्रेस
 • वैशाली येडे – प्रहार संघटना
 • प्रवीण पवार – वंचित बहुजन आघाडी

निवडणुकीच्या तारखा जाहीर

केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.

महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें