‘जयकांत शिकरे’ निवडणुकीच्या रिंगणात

'जयकांत शिकरे' निवडणुकीच्या रिंगणात

बंगळुरु (कर्नाटक) : हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेमातील दिग्गज अभिनेते प्रकाश राज हे आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. प्रकाश राज यांनी नव्या वर्षाचे निमित्त साधत ट्विटरवरुन यासंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे. आपण लोकसभेची निवडणूक लढवणार असून, अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरु, असे प्रकाश राज यांनी सांगितले आहे. मात्र, कुठल्या मतदारसंघातून ते निवडणूक लढवतील, हे त्यांनी सांगितले नाही. त्यामुळे प्रकाश राज कुठल्या जागेवरुन निवडणूक लढवतील, याची उत्सुकता सगळ्यांना आहे.

चार-पाच महिन्यांवर लोकसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे आतापासूनच देशभरात निवडणुकीचं वातावरण तापू लागलं आहे. मोदी सरकारविरोधात देशभरातील विरोधक एकवटत असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे टीकाकार समजले जाणारे अभिनेते प्रकाश राज हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने या निवडणुकीला आणखी रंगत येईल, यात शंका नाही.

प्रकाश राज यांनी ट्वीटमध्ये काय म्हटलंय?

“सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. नवीन सुरुवात, नवी जबाबदारी. अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभेची निवडणूक मी लढणार नाही. लोकसभा मतदारसंघाची माहिती लवकरच देईन. अब की बार जनता की सरकार” – अभिनेते प्रकाश राज यांचे ट्वीट

राजकीय मुद्द्यांवर सडेतोड भूमिका घेणारे कलाकार म्हणून अभिनेते प्रकाश राज प्रसिद्घ आहेत. जनतेची बाजू खंबीरपणे माध्यमांमधून असो वा आपल्या वैयक्तिक पातळीवर असो, प्रकाश राज कायम मांडत आले आहेत. शिवाय, आपल्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून तळागाळात जाऊन कामही ते करत असतात. विविध माध्यमांमधून नागरिकांच्या न्याय्य-हक्कांसाठीही ते आवाज उठवत असतात. प्रसंगी रस्त्यावरही उतरताना दिसले आहेत. त्यामुळे अभिनेते प्रकाश राज हे निवडणूक लढवणार असल्याचे कळल्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.

प्रकाश राज यांनी ‘हिंदूविरोधी’ सुद्धा ठरवले गेले होते. मात्र, त्यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते की, “मी हिंदूविरोधी नाहीय. मी केवळ मोदीविरोधी आहे. टीकाकार मला, हिंदूविरोधी म्हणतात. मात्र, माझं त्यांना सांगणं आहे की, मी मोदी-शाह-हेगडे विरोधी आहे.”

काही दिवसांपूर्वीच मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या चार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रकाश राज यांनी भाजपवर निशाणा साधला होता.

प्रकाश राज यांची सिनेसृष्टीतील कारकीर्द

दाक्षिणात्य सिनेमांमध्ये अभिनेते प्रकाश राज यांच्या खलनायकाच्या भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरल्या. हिंदीतही त्यांची लोकप्रियता मोठी आहे. वाँटेड, सिंघम, दबंग 2, बच्चा सिंग, मुंबई मिरर, पोलिसगिरी इत्यादी हिंदी सिनेमांमध्ये त्यांनी काम केले आहे. ‘सिंघम’ सिनेमातील ‘जयकांत शिकरे’ची भूमिका प्रचंड गाजली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI