राहुल गांधींशी संवाद सुबोध भावेला भोवला!

राहुल गांधींशी संवाद सुबोध भावेला भोवला!


मुंबई : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुण्यातील भारती विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी अभिनेता सुबोध भावे आणि आरजे मलिष्का या दोघांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडली. मात्र, या कार्यक्रमामुळे सुबोध भावेला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे. विशेषत: शिवसैनिकांनी सुबोध भावेविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला. याचे कारण सुबोध भावे हा शिवसेनेच्या चित्रपट सेनेचा उपाध्यक्ष आहे.

पुण्यातील संवाद कार्यक्रमात सुबोध भावे यांनी राहुल गांधी यांच्याशी संवाद साधताना म्हटले होते की, “अनेकजण मी राहुल गांधींसारखा दिसतो असे म्हणतात. मला तुमच्यावर चरित्रपट सुद्धा करायचा आहे.” याच वाक्यावरुन अनेक शिवसैनिक, तसेच सुबोध भावेच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याला ट्रोल केले.

सोशल मीडियावरील ट्रोलिंगनंतर सुबोध भावेने फेसबुकवरुन आपली भूमिका मांडली. या पोस्टमधून आणखी एक मोठी गोष्ट सुबोध भावेने सांगितली, ती म्हणजे, “कार्यक्रम खेळता ठेवण्यासाठी गंमत म्हणून चरित्रपट करायचा विषय काढला.” त्यामुळे सुबोध भावे नक्की राहुल गांधींवर सिनेमा बनवणार का, हाही प्रश्न आता उपस्थित होतो आहे.

सुबोध भावेने फेसबुकवरुन काय स्पष्टीकरण दिलंय?

मी रंगभूमीचा कलाकार आहे.रंगभूमी मला माणसाला समजून घ्यायला शिकवते,सर्वांशी आदरानी आणि प्रेमानी वागायला शिकवते.

रंगभूमी कोणालाच अस्पृश्य समजत नाही आणि मी ही समजत नाही.

माझे संस्कार मला माणसांमध्ये भेदाभेद शिकवत नाहीत.

मी शिवसेना चित्रपट सेनेचा उपाध्यक्ष म्हणून काम करतो आणि मला त्याचा अभिमान आहे.

माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आणि माझ्यावर हि जबाबदारी देणाऱ्या उध्दव साहेबांचा माझ्यावर विश्वास आहे आणि प्रेम आहे.

आजपर्यंत मी मोहनजी भागवत,शरद पवार साहेब,देवेंद्र फडणवीस साहेब,राज साहेब,रामदासजी आठवले या सर्वांना अतिशय प्रेमानी भेटलो आणि त्यांच्या विषयी माझ्या मनामध्ये आदर आहे.

काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुलजी गांधी यांना ही त्यांची मुलाखत घेण्याच्या निमित्ताने(जे माझ काम आहे) मी त्याच आदर आणि प्रेमानी भेटलो.त्यांना भेटून आनंद झाला.त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा.

ता क

आता मुद्दा त्यांच्यावर चरित्रपट करायचा!

कार्यक्रम खेळता ठेवण्यासाठी गंमत म्हणून चरित्रपट करायचा विषय काढला.

(आणि त्यांचं काम मी करूच शकतो कारण कोणाच्या तरी म्हणण्याप्रमाणे मी भारतरत्न ए. पी.जे.अब्दुल कलाम सर, सेरेना विल्यम्स यांच्या भूमिका करू शकतो तर राहुल गांधींची का नाही?)

कळावे

लोभ असावा

आपला

सुबोध भावे

दुसरीकडे, सुबोध भावेवर शिवसैनिकांची मोठी नाराजी आहे. कारण सुबोध भावे शिवसेना प्रणित चित्रपट सेनेचे उपाध्यक्षही आहे. शिवाय, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसाठी कलाकार डोकेदुखी ठरत असल्याचीही चर्चा आहे. कारण याआधी शिवसेना नेते आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी सेनेला राम राम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला. ते शिरुरमधून शिवसेनेच्या खासदाराच्याच विरोधात निवडणूक लढवत आहेत.

शिवसेनेतील काहीजण सुबोध भावेच्या पाठीशी

शिवसेनेतील काही नेते सुबोध भावेच्या पाठीशी आहेत. राहुल गांधींशी अशाप्रकारे संवाद साधण्यात गैर काहीच नसल्याचे शिवसेनेतील काही नेत्यांचे म्हणणे आहे. तसेच, सुबोधला ट्रोल करणाऱ्यांमध्ये शिवसैनिक नसल्याचाही दावा करण्यात येत आहे.

सुबोध भावेची फेसबुक पोस्ट :

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI