औरंगाबादमध्ये उलटफेर, हर्षवर्धन जाधव यांना एमआयएमचा पाठिंबा

| Updated on: Oct 19, 2019 | 1:58 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election) प्रचंड चुरशीची झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी ऐनवेळी पक्षांतरंही केली आहेत.

औरंगाबादमध्ये उलटफेर, हर्षवर्धन जाधव यांना एमआयएमचा पाठिंबा
Follow us on

औरंगाबाद : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election) प्रचंड चुरशीची झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी ऐनवेळी पक्षांतरंही केली आहेत. अखेरच्या काळात अनेक राजकीय गणितं बदलताना दिसत आहेत. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी शिव स्वराज्य पक्षाचे प्रमुख हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा (AIMIM Support Harshavardhan Jadhav) जाहीर केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे कन्नड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. विशेष म्हणजे लोकसभेला हर्षवर्धन जाधव यांना मिळालेल्या मतांमुळेच मतविभाजन होऊन शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला होता. त्यामुळे हर्षवर्धन जाधव यांच्या मदतीची परतफेड म्हणूनच एमआयएमने जाधव यांना पाठिंबा दिल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे काही दिवसांआधीच हर्षवर्धन जाधव यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली होती. त्यानंतर त्यांच्या घरावर शिवसैनिकांकडून हल्ला देखील झाला होता. आता एमआयएमने पाठिंबा दिल्याने या गोष्टींचा एकमेकांशी काही संबंध होता का अशीही शंका व्यक्त केली जात आहे.

एमआयएमने या निर्णयातून शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. सोबतच एमआयएमला मुस्लिमेत्तर समाजामध्ये देखील काही प्रमाणात समर्थन मिळेल, असा अंदाज लावला जात आहे. याचा फायदा औरंगाबाद पूर्व मध्ये गफार कादरी यांन होऊ शकतो, असंही बोललं जात आहे.

हर्षवर्धन जाधव हे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. जाधव यांनी औरंगाबादमध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. अपक्ष निवडणूक लढणाऱ्या हर्षवर्धन जाधव हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते.

हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. हर्षवर्धन जाधव हे कन्नड विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार होते. त्यांनी मराठा आरक्षणासाठी शिवसेनेसह आमदारकीही सोडली होती. त्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणूक अपक्ष लढवली होती.

हर्षवर्धन जाधव यांनी आपली राजकीय कारकीर्द मनसेतून केली. मनसेकडून ते विधानसभेवर निवडून गेले होते. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि कन्नडमधून निवडणूक लढवत विजय मिळवला होता.

संबंधित बातम्या 

खैरेंच्या आरोपांना हर्षवर्धन जाधवांची सडेतोड उत्तरं !   

पराभवामुळे चंद्रकांत खैरेंचं मानसिक संतुलन बिघडलं : हर्षवर्धन जाधव  

दानवेंनी पूर्ण भाजपा पाठीशी उभी करतो सांगितलं, पण मदत केली नाही : हर्षवर्धन जाधव