पराभवामुळे चंद्रकांत खैरेंचं मानसिक संतुलन बिघडलं : हर्षवर्धन जाधव

शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिवस्वराज्य पक्षाचे प्रमुख हर्षवर्धन जाधव यांच्यावर वडिलांची हत्या केल्याचा घणाघाती आरोप केल्यानंतर जाधव यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली.

Chandrakant Khaire, पराभवामुळे चंद्रकांत खैरेंचं मानसिक संतुलन बिघडलं : हर्षवर्धन जाधव

औरंगाबाद : शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिवस्वराज्य पक्षाचे प्रमुख हर्षवर्धन जाधव यांच्यावर वडिलांची हत्या केल्याचा घणाघाती आरोप केल्यानंतर जाधव यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली. लोकसभा निवडणुकीतील पराभवाने खैरेंचे मानसिक संतुलन बिघडल्याचे मत हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केले. तसेच त्यांनी स्वतःची तपासणी करावी असा सल्लाही दिला.

हर्षवर्धन जाधव यांनी फोनवरुन खैरेंच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. जाधव म्हणाले, “चंद्रकांत खैरे यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. त्यांनी स्वतःची तपासणी करावी. माझ्या वडिलांचा मृत्यू ह्रदय विकाराच्या धक्क्याने झाला. त्यांच्यावर त्याआधी हिंदुजा रुग्णालयात अनेक दिवस उपचार सुरु होते.”

दरम्यान, चंद्रकांत खैरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पराभवाला कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना जबाबदार धरत त्यांच्यावर बेछूट आरोप केले होते. शनिवारी (8 जून) औरंगाबाद जिल्हा शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात हर्षवर्धन जाधव यांच्यावर वडिलांना आणि वहिनीला मारुन टाकल्याचा आरोप केला होता. खैरेंच्या या आरोपामुळे औरंगाबाद शहरात मोठा राजकीय भुकंप झाला.

काय आहेत खैरेंचे आरोप?

मागील 20 वर्षांपासून खासदार असलेल्या चंद्रकांत खैरेंचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला. हाच पराभव पचवणे खैरेंना कठीण जातंय की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण पराभूत झाल्यापासून चंद्रकांत खैरेंनी अनेक बेछूट आरोप केले आहेत. पराभव होण्याआधी खैरेंनी रावसाहेब दानवे यांच्यावर युती धर्म न पाळता जावई धर्म पाळल्याचाही आरोप केला होता. यावेळी हर्षवर्धन जाधव यांनी खैरेंना स्वतःचा पराभव दिसत असल्याने ते असे आरोप करत आहेत, असं उत्तर दिलं होतं. खैरेंच्या आरोपानंतरही रावसाहेब दानवे यांना केंद्रात मंत्रिपदी वर्णी लागली. त्यानंतर चंद्रकांत खैरेंनी पुन्हा एकदा हर्षवर्धन जाधव यांच्यावर आरोप केले आहेत.

कोण होते हर्षवर्धन जाधव यांचे वडिल?

हर्षवर्धन जाधव यांचे वडील रायभान जाधव हे तत्कालीन जिल्हाधिकारी होते. 12 वर्षे जिल्हाधिकारी म्हणून काम केल्यानंतर रायभान जाधव यांनी निवृत्ती घेऊन राजकारणात प्रवेश केला. ते कन्नड विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. या कालावधीत त्यांनी कन्नडमध्ये एक सहकारी साखर कारखानाही उभा केला.

याच कारखान्याच्या सभेत हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या वडिलांना मारहाण केल्याचा आरोप चंद्रकांत खैरेंनी याआधीही अनेकदा केला आहे. आता मात्र त्यांनी हर्षवर्धन जाधव यांच्यावर थेट वडिलांच्या हत्येचा आरोप केला. त्यामुळे अनेकजण आश्चर्य व्यक्त करु लागले आहेत. कारण हर्षवर्धन जाधव यांच्या वडिलांचा मृत्यू ह्रदय विकाराच्या धक्क्याने झाला होता हे सर्वश्रुत आहे.

चंद्रकांत खैरेंनी केलेला दुसरा आरोप म्हणजे हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या वहिनीचीही हत्या केली. चंद्रकांत खैरे यांच्या या आरोपाबाबत मात्र अनेकजण अनभिज्ञ आहेत. त्यामुळे खैरे यांनी हा आरोप कशाच्या आधारे केला हा एक प्रश्न आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *