अमित शाहांची उपस्थिती, पंकजा मुंडेंचं दसरा मेळाव्याला भव्य शक्तीप्रदर्शन

यावेळी 8 ऑक्टोबरला भाजपाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती असेल. 2014 लाही विधानसभा निवडणुकीच्या अगोदर अमित शाह यांनी भगवान गडावरील (Bhagwan Bhakti Gad Dasara Melava) दसरा मेळाव्याला उपस्थिती लावली होती.

अमित शाहांची उपस्थिती, पंकजा मुंडेंचं दसरा मेळाव्याला भव्य शक्तीप्रदर्शन

बीड : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे दरवर्षीप्रमाणे यावेळीही भगवान भक्तीगडावर (Bhagwan Bhakti Gad Dasara Melava) म्हणजेच संत भगवान बाबा यांची जन्मभूमी सावरगावात शक्तीप्रदर्शन करणार आहेत. यावेळी 8 ऑक्टोबरला भाजपाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती असेल. 2014 लाही विधानसभा निवडणुकीच्या अगोदर अमित शाह यांनी भगवान गडावरील (Bhagwan Bhakti Gad Dasara Melava) दसरा मेळाव्याला उपस्थिती लावली होती.

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर पंकजा मुंडे यांनी 2014 ला त्यांचा राजकीय वारसा सांभाळला. विधानसभेपूर्वी त्यांनी संघर्ष यात्रा काढत अनेक मतदारसंघ पिंजून काढले. भगवान गडावर झालेल्या दसरा मेळाव्यात अमित शाहांच्या उपस्थितीत त्यांनी शक्तीप्रदर्शन केलं होतं. पण नंतरच्या काळात भगवान गडावरील दसरा मेळाव्याची प्रथा खंडीत झाली.

गेल्या तीन वर्षांपासून दसरा मेळावा हा सावरगावात होत आहे. यावेळीही पंकजा मुंडेंनी समर्थकांना दसरा मेळाव्याचं निमंत्रण दिलंय. विधानसभा निवडणूक आणि त्यात पारंपरिक दसरा मेळावा यामुळे पंकजा मुंडेंनी शक्तीप्रदर्शनाची जय्यत तयारी केली आहे.

8 ऑक्टोबर रोजी हा दसरा मेळावा होत आहे. गावा-गावातून भगवान बाबांच्या प्रतिमा असलेली भगवी पताका घेऊन यावे, या पताका भगवानबाबांच्या स्मारकासमोर अमित शाह यांच्या हस्ते रोवण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंडे समर्थकांकडून दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे. या दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून लाखो समर्थक येतात. त्यामुळे अमित शाहा यांच्या प्रमुख उपस्थितीतील हा दसरा मेळावा अभूतपूर्व होण्याची तयारी सुरु झाली आहे.

पंकजा मुंडे 3 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार

पक्षाकडून पंकजा मुंडे यांना परळीतून उमेदवारी जाहीर झाली आहे. 3 ऑक्टोबरला शक्तीप्रदर्शन करत त्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सध्या त्यांच्याकडून बूथ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन सुरु आहे. यानंतर 3 ऑक्टोबरला शक्तीप्रदर्शन करत अर्ज भरला जाईल.

“मी थेट बूथ प्रमुखांच्या संपर्कात राहणार आहे. कुणाच्या धमक्यांना घाबरू नका, कसलीही काळजी करू नका, तुमची सुरक्षा करेल,” अशा शब्दात पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना बळ दिलं आहे. या निवडणुकीने विजयाची हॅटट्रिक करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे प्रत्येकाने जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन केलेल्या कामांची सर्वांना माहिती द्यावी, मताधिक्य वाढविण्याची स्पर्धा करावी, असं आवाहन त्यांनी केलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *