कॉंग्रेसच्या हातून आणखी एक राज्य जाणार? 6 बंडखोर आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

काँग्रेसचे सुधीर शर्मा, रवी ठाकूर, राजेंद्र राणा, चैतन्य शर्मा, देवेंद्र भुट्टो आणि इंदर दत्त लखनपाल या बंडखोर आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याशिवाय तीन अपक्ष आमदारांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे काँग्रेसच्या हातून आणखी एक राज्य जाण्याची शक्यता आहे.

कॉंग्रेसच्या हातून आणखी एक राज्य जाणार? 6 बंडखोर आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश
himachal pradesh
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Mar 23, 2024 | 3:25 PM

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशमध्ये प्रंचड मोठी घडामोड घडली आहे. राज्यसभा निवडणुक दरम्यान क्रॉस व्होट करणाऱ्या सहा कॉंग्रेस आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. बहुमतासाठी आवश्यक असणारे संख्याबळ कमी झाल्याने हिमाचल प्रदेशमधील कॉंग्रेस सरकार अल्पमतात गेलं आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या 68 जागा आहेत. तर बहुमतासाठी 35 जागा आवश्यक आहेत. मात्र या सहा आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे कॉंग्रेसचे संख्याबळ 34 इतके झाले आहे. यामुळे आणखी एक राज्य हातातून गमावण्याची वेळ कॉंग्रेसवर आली आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये नुकतीच राज्यसभेच्या एका जागेसाठी निवडणूक झाली. ही जागा जिंकण्यासाठी उमेदवाराला 35 मतांची गरज होती. काँग्रेसचे 40 आमदार होते त्यामुळे पक्षाचे उमेदवार अभिषेक मनु सिंघवी यांचा विजय निश्चित मानला जात होता. तर, भाजप उमेदवार हर्ष महाजन यांना 10 मते कमी पडत होती. निवडणूक दरम्यान कॉंग्रेसच्या सहा आणि तीन अपक्ष आमदार यांनी हर्ष महाजन यांना मतदान केले. मतमोजणी दरम्यान दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाली. त्यामुळे चिठ्ठ्याद्वारे घेतलेल्या निर्णयात भाजपचे हर्ष महाजन विजयी झाले.

निवडणुकीनंतर पक्षाने बंडखोरी करणाऱ्या त्या सहा आमदारांवर पक्षांतरविरोधी कायद्यांतर्गत कारवाई केली. हिमाचल प्रदेशचे सभापती कुलदीप सिंह यांनी त्या 6 आमदारांना निलंबित केले होते. ते म्हणाले की, पक्षांतरविरोधी कायद्यांतर्गत 6 आमदारांविरुद्धची तक्रार आमदार आणि मंत्री हर्षवर्धन यांच्यामार्फत सचिवालयाला प्राप्त झाली. त्यानंतर दोन्ही बाजू ऐकून घेत निर्णय दिला. निलंबित आमदारांनी व्हिपचे उल्लंघन केले होते असे त्यांनी स्पष्ट केले.

निलंबनाच्या कारवाईनंतर कॉंग्रसच्या त्या सहा आमदारांनी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रव्रेश केला. आमदार सुधीर शर्मा, रवी ठाकूर, राजेंद्र सिंह राणा, चैतन्य शर्मा, देवेंद्र भुट्टो, इंदर दत्त लखनपाल अशी त्यांची नावे आहेत. याशिवाय अपक्ष आमदार केएल ठाकूर, होशियार सिंह आणि आशिष शर्मा यांनीही भाजपात प्रवेश केला.

मात्र, या घडामोडीमुळे कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या एकूण 68 जागां आहेत. यातील काँग्रेसकडे 40, भाजपकडे 25 तर अपक्ष 3 आमदार आहेत. या पक्ष प्रवेशामुळे कॉंग्रेसकडे आता 34 जागा झाल्या आहेत. मात्र, यामुळे भाजपची संख्या वाढणार नाही. कारण, त्या सहा आमदारांचे निलंबन झाले आहे. तसेच 3 अपक्ष आमदारांनीही राजीनामे दिले आहेत. मात्र, बहुमतासाठी आवश्यक असणारे 35 हे संख्याबळ कॉंग्रेसकडे नसल्याने येथे मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे.