‘महाराष्ट्र नगरी, चौपट राजा’; आशिष शेलारांचा ठाकरे सरकारवर निशाणा

| Updated on: Oct 16, 2020 | 12:35 PM

राज्यात बार, दारूची दुकानं सुरू झालीत. पण अद्यापही मंदिरं सुरू करण्यात आली नसल्याने राज्य सरकारवर चौफेक टीका होत असून भाजपचे नेते आशिष शेलार यांनीही या विषयावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्र नगरी, चौपट राजा; आशिष शेलारांचा ठाकरे सरकारवर निशाणा
Follow us on

मुंबई: राज्यात बार, दारूची दुकानं सुरू झालीत. पण अद्यापही मंदिरं सुरू करण्यात आली नसल्याने राज्य सरकारवर चौफेक टीका होत असून भाजपचे नेते आशिष शेलार यांनीही या विषयावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. प्राचीन दंतकथेतील आटपाट नगरीच्या कथेचा आधार घेत शेलार यांनी ठाकरे सरकारवर बोचरी टीका केली आहे. (ashish shelar reaction on cm uddhav thackeray statement)

”आटपाट नगरातील अहंकारी राजा आणि विलासी पुत्राची ही गोष्ट… महाराष्ट्र नावाच्या समृद्ध राज्यात कोरोनासोबत पावसाने थैमान घातलेले… शेती, घरे, गुरे सारे काही उद्ध्वस्त झालेले… शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंचा पूर अनावर… तेव्हा नगराचे राजे ‘बॉलिवूड’ कसे वाचवायचे यावर चिंतातूर झालेले… मदतीसाठी राजा येतच नाही म्हणून देवाचा धावा करणारी जनता आता मंदिरे तरी उघडा असा अर्जव करतेय… त्यावेळी नगरात कुणीही मागणी केलेली नसताना पब, बार, रेस्टॉरंट रात्री 11.30 पर्यंत खुले ठेवून ‘नाईट लाइफ’ची काळजी राजपुत्र करत आहेत…दुर्देवी चित्रं… ‘महाराष्ट्र नगरी आणि चौपट राजा’..,” असं ट्विट करत शेलार यांनी राज्यसरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत.

राज्यातील मंदिरं सुरू करण्याची मागणी गेल्या काही महिन्यांपासून होत आहे. भाजप, एमआयएम, मनसे आणि वंचित बहुजन आघाडीसह धार्मिक संघटनांनीही मंदिरं उघडण्याची मागणी केली आहे. भाजप, वंचित बहुजन आघाडी आणि धार्मिक संघटनांनी तर या विषयावर आंदोलनेही केली आहेत. मात्र, तरीही सरकारने या मागण्यांकडे पूर्णपणे कानाडोळा केल्याने त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दुसरीकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहून राज्यातील मंदिरं सुरू करण्याची सूचना केली होती. यावेळी राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण करून दिली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनीही पत्र लिहून आम्हाला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नसल्याचं राज्यपालांना सुनावलं होतं. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये शाब्दिक चकमकी उडाल्या होत्या. परिणामी मंदिर सुरू करण्याचा मुद्दा मागे पडून हिंदुत्वावरूनच दोन्ही पक्षात जुंपल्याचं चित्रं होतं. दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने पुन्हा अनलॉकची नियमावली जाहीर केली होती. त्यातही मंदिर सुरू करण्याचा उल्लेख करण्यात आला नव्हता. उलट काल मुख्यमंत्र्यांनी सिनेउद्योगाशी निगडीत काही लोकांशी काल संवाद साधला होता. यावेळी त्यांनी बॉलिवूड इतरत्र हलविण्याचा किंवा बॉलिवूडला संपविण्याचा काही लोकांचा डाव असून हा डाव हाणून पाडणार असल्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर शेलार यांनी ही खोचक टीका केली आहे. (ashish shelar reaction on cm uddhav thackeray statement)

संबंधित बातम्या:

बॉलिवूडला संपवण्याचं कारस्थान सहन करणार नाही; उद्धव ठाकरे गर्जले!

गाईडलाईन तयार होताच सिनेमागृहे सुरु करु; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आश्वासन

Amazon Prime | सिनेमागृह उघडण्यापूर्वीच प्रेक्षकांना OTT कडे खेचण्याचा प्रयत्न, ‘अ‍ॅमेझॉन प्राईम’वर नऊ नव्या सिनेमांचे गिफ्ट

(ashish shelar reaction on cm uddhav thackeray statement)