विधानसभेच्या तोंडावर देवेंद्र फडणवीसांकडे भाजप सोपवणार मोठी जबाबदारी, ‘या’ आधारावर मिळणार उमेदवारी
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीला भूपेंद्र यादव, विनोद तावडे उपस्थित होते. या बैठकीत विधानसभा निवडणूक, जागावाटप, जागांची निवड यांसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

BJP Devendra Fadnavis Responsibility : विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्ष हे विविध विधानसभा जागांची चाचपणी करताना दिसत आहेत. अनेक पक्षांचे राजकीय दौरेही सुरु झाले आहेत. महायुतीकडून कोणाला किती जागा मिळणार याबद्दल विविध चर्चा सुरु आहेत. त्यातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपकडून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
भाजपच्या कोअर कमिटीच्या नेत्यांची बैठक नुकतीच पार पडली. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीला भूपेंद्र यादव, विनोद तावडे उपस्थित होते. या बैठकीत विधानसभा निवडणूक, जागावाटप, जागांची निवड यांसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी भाजपने महाराष्ट्रात 150 पेक्षा जास्त जागा लढवाव्यात, असे मत वरिष्ठांनी व्यक्त केले. त्यासोबत मित्रपक्षांना कोणत्या आणि किती जागा द्यायच्या हे ठरवण्याचा अधिकार देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांवर मोठी जबाबदारी असणार आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप कोणत्या जागांवर लढणार, हे निश्चित करण्याचे अधिकार देवेंद्र फडणवीसांना देण्यात आले आहेत. त्यासोबतच महायुतीत जे मित्रपक्ष आहेत, त्यांना कोणत्या जागा द्यायचा, याचाही निर्णय देवेंद्र फडणवीसांना घ्यावा लागणार आहे.
भाजप महाराष्ट्रात 150 पेक्षा जास्त जागा लढणार
येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने महाराष्ट्रात 150 पेक्षा जास्त जागा लढवाव्यात, असे भाजपा वरिष्ठांचे मत आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना विधानसभा निहाय मिळालेली मते आणि गेल्या विधानसभेत मिळालेली मते याचे एक सर्वेक्षण केले जाणार आहे. या सर्वेक्षण अहवालाच्या आधारे विधानसभा निहाय उमेदवार निवडले जाणार आहेत. यात कोणत्या जागा शिवसेना शिंदे गटाला आणि कोणत्या जागा राष्ट्रवादी पवार गटाला सोडायच्या याबद्दल विचारमंथनही सुरु झाले आहे.
‘या’ आधारे उमेदवारी ठरवणार
महायुतीत गेल्या विधानसभेला ज्या पक्षाने जी जागा जिंकली असेल, त्याच्याकडे ती जागा तशीच राहील. मात्र काही मोजक्या जागा संदर्भात फेरबदल होऊ शकतो. तसेच जिंकून येण्याची खात्री असलेला उमेदवार महायुतीतील कोणत्या पक्षाकडे आहे, याबाबतही विचार केला जाईल. तसेच लोकसभा निकाल व सर्वेक्षण अहवाल या आधारे उमेदवार ठरवला जाईल, अशीही चर्चा या बैठकीदरम्यान झाल्याचे बोललं जात आहे.
