बंडातात्या कराडकर यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याची महिला आयोगाकडून गंभीर दखल; कारवाईची शक्यता, नेमकं वक्तव्य काय?

| Updated on: Feb 03, 2022 | 9:33 PM

बंडातात्या यांच्या या वक्तव्याची गंभीर दखल आता राज्य महिला आयोगाने घेतलं आहे. महिलाबाबतचं त्यांचं हे वक्कव्य खपवून घेतलं जाणार नाही. सातारा पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करुन अहवाल दोन दिवसांत सादर करावा, असा आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत.

बंडातात्या कराडकर यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याची महिला आयोगाकडून गंभीर दखल; कारवाईची शक्यता, नेमकं वक्तव्य काय?
बंडातात्या कराडकर, रुपाली चाकणकर
Follow us on

पुणे : प्रसिद्ध कीर्तनकार बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. सर्वच पक्षांच्या महिला नेत्यांनी बंडातात्या यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केलाय. तसंच बंडातात्या यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणीही केली आहे. दरम्यान, बंडातात्या यांच्या या वक्तव्याची गंभीर दखल आता राज्य महिला आयोगाने घेतलं आहे. महिलाबाबतचं त्यांचं हे वक्कव्य खपवून घेतलं जाणार नाही. सातारा पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करुन अहवाल दोन दिवसांत सादर करावा, असा आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिले आहेत.

राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल

“बंडा तात्या कराडकर यांनी खासदार सुप्रियाताई सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल जे वादग्रस्त वक्तव्य केल आहे, ते अत्यंत संतापजनक आहे. त्यांच्या या वक्त्व्यामुळे महिलांच्या आत्मसन्मानाला व प्रतिष्ठेला धक्का पोचलेला आहे. याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. सातारा पोलीसांनी या वक्तव्याबाबत बंडातात्या कराडकर यांच्यावर कडक कारवाई करावी. याचा अहवाल 48 तासाच्या आत महिला आयोगास सादर करावा. तसेच बंडातात्या कराडकर यांनी सात दिवसाच्या आत आपला लेखी खुलासा आयोगास सादर करावा”, असा आदेश रुपाली चाकणकर यांनी दिला आहे.

महिला नेत्यांकडून बंडातात्यांवर जोरदार टीका

शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी बंडातात्या कराडकर यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतलाय. बंडातात्या कराडकर स्वत:ला कीर्तनकार म्हणवतात आणि अशाप्रकारे स्त्रीत्वाचे धिंडवडे काढतात. स्त्रियांचा जाहीररित्या अपमान करतात. हे खपवून घेतलं जाणार नाही. त्यांनी जाहीररित्या माफी मागावी. अन्यथा मी पोलिसांना विनंती करते की त्यांनी बंडातात्या यांना जाब विचारावा, त्यांना चौकशीला बोलवावं, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कायंदे यांनी केलीय.

तर खासदार नवनीत राणा यांनीही बंडातात्या यांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय. आम्ही वाईनच्या विरोधात आहोत. या निर्णयावर महाराष्ट्रातील आम्ही सगळ्या महिला विरोधात आहोत. पण बंडातात्या कराडकर यांचे महिलांबाबतचं वक्तव्य, अशा प्रकारचं बोलणं आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा नवनीत राणा यांनी दिलाय.

त्याचबरोबर नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या रुपाली पाटील यांनीही बंडातात्यांवर जोरदार टीका केलीय. बंडातात्या कराडकर यांनी माफी मागावी. सुप्रिया सुळे या महिलांचं नेतृत्व करतात. त्यामुळे बंडातात्यांनी महिलांचा अपमान केलाय, त्यामुळे बंडातात्यांनी महिलांची माफी मागितली पाहिजे, अशी आक्रमक मागणी रुपाली पाटील यांनी केलीय.

बंडातात्या यांचं नेमकं वक्तव्य काय?

‘माफी मागायला तयार, विषय आता संपवा’

दरम्यान, बंडातात्या कराडकर यांनी सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांना फोन करुन माफी मागितल्याची माहिती मिळत आहे. तसंच आपल्या वक्तव्याचे माध्यमामध्ये जोरदार पडसाद उमटल्यानंतर आपण माफी मागायला तयार आहोत, पण आता हा विषय संपवा, असं बंडातात्या म्हणाले. मी फक्त एवढंच बोललो नाही. मात्र, माध्यमांमध्ये माझं तेवढंच वक्तव्य दाखवण्यात आलं. आपण चुकलो असू तर माफी मागण्यात कमीपणा नसतो, असं म्हणत बंडातात्या यांनी दिलगिरी व्यक्त केलीय.

इतर बातम्या : 

‘ढवळ्या शेजारी पवळा बांधला’, बंडातात्यांकडून ठाकरेंचं कौतुक तर अजितदादांना टोला!

पुन्हा अमृता फडणवीसांच्या ट्विटवरून महिला नेत्यांची जुंपली, रुपाली पाटील-श्वेता महाले आमनेसामने