राजकीय पक्षांचा बँक बॅलन्स, भाजप पाचव्या नंबरवर, श्रीमंत कोण?

राजकीय पक्षांचा बँक बॅलन्स, भाजप पाचव्या नंबरवर, श्रीमंत कोण?

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांच्या बँक बॅलन्सची आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार सर्वाधिक बँक बॅलन्स असलेला राजकीय पक्ष हा मायावतींचा बहुजन समाज पक्ष ठरला आहे. आश्चर्य म्हणजे या यादीत अमित शाह अध्यक्ष असलेला भाजप पाचव्या क्रमांकावर आहे. मायावतींच्या बसपाचा बँक बॅलन्स 669 कोटी रुपये आहे. बसपाने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या माहितीनंतर ही आकडेवारी समोर आली आहे.

मायावतींच्या बसपाला 2014 च्या लोकसभा निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नव्हती. बसपाने यानंतर पाच वर्षात कोणतीही निवडणूक लढवली नव्हती. बसपाकडे 95.54 लाख रुपये रोक रक्कम आहे.

दुसऱ्या नंबरवर कोण?

या यादीत दुसऱ्या नंबरवर समाजवादी पक्ष आहे. सध्या लोकसभा निवडणुकीत बसपासोबत युती केलेल्या समाजवादी पक्षाचा विविध खात्यातील बँक बॅलन्स 471 कोटी रुपये आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणात झालेल्या विधानसभा निवडणुकांमुळे पक्षाचे 11 कोटी रुपये खर्च झाले.

काँग्रेसचा तिसरा नंबर

या यादीत काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे. काँग्रेसकडे 196 कोटी रुपये बँक बॅलन्स आहे. ही माहिती गेल्या वर्षी 2 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाला दिली होती. काँग्रेसने मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीत केलेल्या खर्चाचा तपशील जाहीर केलेला नाही.

भाजप पाचव्या क्रमांकावर

दरम्यान, या यादीत चंद्राबाबू नांदेड यांच्या तेलुगु देसम पक्षानंतर भाजपचा नंबर लागतो. भाजपकडे केवळ 82 कोटी रुपयांचा बँक बॅलन्स आहे. तर टीडीपीकडे 107 कोटी रुपये आहेत. भाजपच्या दाव्यानुसार 2017-18 मध्ये मिळालेल्या 1027 कोटींपैकी 758 कोटी रुपये पक्षाने खर्च केले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI