चिमुकल्या भावंडांकडून 15 हजारांची ईदी कोरोना लढ्याला, अजितदादांनी कौतुकाने खाऊचा पुडा दिला

बारामतीच्या बागवान कुटुंबातील मुलांनी आपल्याकडील ईदी कोरोना लढयासाठी देण्याचा स्तुत्य निर्णय घेतला.

चिमुकल्या भावंडांकडून 15 हजारांची ईदी कोरोना लढ्याला, अजितदादांनी कौतुकाने खाऊचा पुडा दिला

बारामती : रमजान ईदमध्ये नातेवाईक आणि वडीलधाऱ्यांनी दिलेली ईदी जपून ठेवत बारामतीमधील चिमुकल्या भावंडांनी कोरोना लढ्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दान केली. मुलांनी दाखवलेलं सामाजिक भान पाहून उपमुख्यमंत्री अजित पवारही भारावून गेले आणि त्यांनी कौतुकाने खाऊचा पुडा त्यांना भेट दिला. (Baramati Bagwan Children Donates Eidi to CM Relief Fund for Corona to Deputy CM Ajit Pawar)

रमजान ईद झाल्यानंतर कित्येक दिवस उलटूनही घरातील मुलं मिळालेली ईदी खर्च करत नाहीत. नेमकं याचं कारण काय असावं, म्हणून बारामतीच्या बागवान कुटुंबातील पालकांनी आपल्या मुलांना विचारणा केली आणि त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. या मुलांनी आपल्याकडील ईदी कोरोनाच्या कामासाठी देण्याचा निर्धार पालकांना बोलून दाखवला.

नेहमीप्रमाणे या रकमेतून मुले काहीतरी खरेदी करतील या विचारात पालक असतानाच या चिमुकल्यांनी ही रक्कम कोरोना लढ्यासाठी वापरण्याचा मानस व्यक्त केला. फिरोज आणि अमजद बागवान या दोघा भावंडांच्या चार चिमुकल्यांनी हे स्तुत्य पाऊल उचलले.

जिशान फिरोज बागवान, मलिका अमजद बागवान, फरहान फिरोज बागवान आणि अमन अमजद बागवान या चिमुकल्यांकडे रमजान ईदनंतर जवळपास 15 हजार रुपये ईदी जमा झाली. या मुलांसह फिरोज बागवान, बतुल शेख यांनी या रकमेचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला.

हेही वाचा : पुण्याच्या महापौरांपाठोपाठ कुटुंबीयही कोरोनाच्या विळख्यात, मोहोळ कुटुंबातील आठ जणांना लागण

लहानग्यांचे विचार ऐकून अजित पवारही भारावून गेले. त्यांनी या मुलांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. आपल्या गाडीतून खाऊचा पुडा काढून या लहानग्यांना कौतुकाची थाप दिली. अजितदादांनी कौतुक केल्यामुळे चिमुकल्या भावंडांच्या चेहऱ्यावरही समाधानाचे भाव दिसले.

(Baramati Bagwan Children Donates Eidi to CM Relief Fund for Corona to Deputy CM Ajit Pawar)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI