
Bhaskar Jadhav : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आता उद्धव ठाकरे पुन्हा एकदा शिवसेना उभी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी पक्षातील बड्या नेत्यांना सोबत घेऊन राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात संघटना नव्याने उभी करण्याचे काम चालू आहे. असे असतानाच आता महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. ठाकरेंच्या शिवसेना पक्षात आता लवकरच आणखी एक मोठे बंड होणार असून कोकणातील बडा नेता तब्बल 10 आमदार घेऊन थेट भाजपात जाणार असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे या पक्षांतराच्या चर्चेमुळे सध्या महायुतीतील भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतही नवा वाद निर्माण झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता राजकारणात पुन्हा एकदा मोठा बॉम्ब फुटणार, असे बोलले जात आहे.
सध्या ठाकरेंच्या शिवसेना पक्षात मोठ्या घडामोडी घडत असल्याचे बोलले जात आहे. विरोधी पक्षनेतेपदावरून कोकणातील बडे नेते आमदार भास्कर जाधव नाराज असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदावरून ठाकरेंच्या शिवसेनेत संघर्ष निर्माण झाल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. भास्कर जाधव हे विरोधी पक्षनेतेपदासाठी इच्छुक आहेत. परंतु ‘मातोश्री’वरून ऐनवेळी आमदार आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच आता भास्कर जाधव नाराज आहेत, अशी जोरदार चर्चा रंगली आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर बरेच आमदार त्यांच्यासोबत गेले. आता शिंदे सत्तेत आहेत. परंतु कोकणातील भास्कर जाधव हे मात्र शिंदे यांच्यासोबत गेले नाहीत. शिवसेनाफुटीनंतर अडचणीच्या काळात भास्कर जाधव हे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहिले. विधिमंडळात तसेच बाहेरही त्यांनी ठाकरे गटाची बाजू वेळोवेळी लावून धरलेली आहे. त्यामुळेच मला विरोधी पक्षनेतेपद मिळेल, अशी भास्कर जाधव यांना अपेक्षा होती. पण ऐनवेळी त्यांना संधी देण्यात आली नाही. म्हणूनच ते आता ठाकरेंच्या इतर दहा आमदारांसोबत भाजपात जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
भास्कर जाधव दहा आमदार घेऊन भाजपात जणार असल्याची चर्चा चालू झाल्यानंतर आता महायुतीच्या भाजपा आणि शिंदे गट या घटकपक्षांत धुसफूस चालू झाल्याचेही सांगितले जात आहे. ठाकरे यांच्या पक्षातून येणाऱ्या आमदारांना भाजपात प्रवेश देऊ नये. हे आमदार येत असतीलच तर त्यांना आमच्या शिवसेना पक्षात प्रवेश द्यावा, अशी भूमिका शिंदे यांच्या शिवसेनेची असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपाची एका प्रकारे कोंडी झाली आहे. यातून काही तोडगा काढता यतो का? यावरही खल चालू असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
दरम्यान, भास्कर जाधव हे नाराज असल्याचे सांगितले जात असल्याने भविष्यात नेमके काय काय घडणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. भास्कर जाधव यांनी खरंच बंड केले तर ठाकरे यांना कोकणात मोठा फटका बसू शकतो. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी पट्ट्यात ठाकरे गटाची भास्कर जाधव यांच्या रुपात मोठी ताकद आहे. त्यामुळे जाधव भाजपात गेले तर कोकणात ठाकरे गट क्षीण होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे भास्कर जाधव यांच्या नाराजीच्या चर्चेनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शिवसेनेत जेव्हा-जेव्हा एखादा नेता आक्रमक होतो तेव्हा तेव्हा त्याला मातोश्रीकडून डावलले जाते का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सोबतच भास्कर जाधव यांना डावलले जात असेल तर शिंदे यांच्या बंडातून मातोश्रीने धडा घेतलेला आहे की नाही? असाही सवाल उपस्थित केला जातोय. त्यामुळे भविष्यात नेमके काय काय घडणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.