गृहनिर्माण खात्यातही मोठी ‘वाझे’ गँग, 100 रुपये प्रती स्क्वेअर फूटचा भाव, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

किरीट सोमय्या यांनी गृहनिर्माण खात्यावर पर्यायाने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर गंभीर आरोप केलाय. गृहनिर्माण खात्यातही मोठं वसूली रॅकेट सुरु असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे

गृहनिर्माण खात्यातही मोठी 'वाझे' गँग, 100 रुपये प्रती स्क्वेअर फूटचा भाव, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप
भाजप नेते किरीट सोमय्या यांचा जितेंद्र आव्हाड यांच्यावर गंभीर आरोप

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला महिन्याला 100 कोटीच्या वसूलीचं टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला. त्यानंतर राज्याच्या राजकारणात उडालेला धुराळा अद्याप शमलेला नाही. अशास्थितीत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गृहनिर्माण खात्यावर पर्यायाने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर गंभीर आरोप केलाय. गृहनिर्माण खात्यातही मोठं वसूली रॅकेट सुरु असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. (Kirit Somaiya’s serious allegations against Housing Minister Jitendra Awhad)

किरीट सोमय्यांचा आरोप काय?

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या आशीर्वादाने एसआरए, म्हाडा, बीएमसी इथं 100 बिल्डरची यादी, 100 आरटीआय, मंत्री महोदयांचे आदेश घेऊन प्रविण कलमे हे केले काही महिने वसुली गँग चालवत आहेत. त्याबाबत किरीट सोमय्या यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अतिरिक्त महासंचालक प्रभात कुमार यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. यावेळी काही पुरावेही दिलायाचा दावा सोमय्या यांच्याकडून करण्यात आलाय.

100 रुपये प्रती फूटचा दर?

100 रुपये प्रती फूट हा सध्याचा एसआरए, म्हाडाचा बिल्डरांसाठी दर चालत आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांना प्रति महिना 100 कोटी रुपये वाझे गँगकडून हवे असतात तर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे वाझे म्हणजे प्रविण कलमे हे महापालिका, म्हाडा, एसआरए मध्ये 100 बिल्डर्सच्या विरोधात 100 आरटीआय करतात. त्यावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड त्वरित अहवाल सादर करावा असे आदेश देतात. लगेच एसआरए असो, म्हाडा असो यांचे ‘वसुली गँग’चे अधिकारी कामाला लागतात. प्रविण कलमेला घेऊन हे अधिकारी प्रत्यक्ष साईट व्हिजीट करतात. ठाकरे सरकारची अजून एक वसूली गँग. याप्रकरणात मंत्रालयात तक्रार केल्यानंतर काही दिवस ही वसुली गँग शांत होती. आता पुन्हा वसुली गँगचे काम जोरात सुरु आहे. कलमे हे ‘अर्थ’, ‘आकांक्षा’ या बोगस एनजीओच्या नावाने पत्र देतात आणि गृहनिर्माण मंत्री त्याच्यावर निर्देश देतात, असा आरोप सोमय्या यांनी केलाय.

आव्हाडांच्या चौकशीची मागणी

सोमय्या यांनी या प्रकरणात प्रभात कुमार यांच्याकडे तक्रार आणि 100 पानांचे पुरावे दिले आहेत. त्याचबरोबर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, प्रविण कलम, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित अधिकारी, म्हाडाचे अधिकारी यांची चौकशी करण्याची मागणीही सोमय्या यांनी केली आहे. दरम्यान, किरीट सोमय्या यांच्या गंभीर आरोपांवर आता जितेंद्र आव्हाड काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

गृहमंत्री अनिल देशमुखांच्या चौकशीवरुन देवेंद्र फडणवीस आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात ट्विटर वॉर

Sachin Vaze Case : सचिन वाझे प्रकरणातील ऑडी अखेर NIAच्या ताब्यात

Kirit Somaiya’s serious allegations against Housing Minister Jitendra Awhad

Published On - 5:30 pm, Thu, 1 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI