भाजपच्या जुन्या लोकांनी ‘या’ बोकड्यापासून सावध रहावे, शिंदेंच्या नेत्याचा रोख कुणाकडे?
माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी काँग्रेससचा हात सोडत भाजपचे कमळ हाती घेतले आहे. अशातच आता गोरंट्याल भाजप प्रवेशावर शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी सडकून टीका केली आहे.

जालन्यातील राजकारणाला वेगळे वळणं मिळाले आहे. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी काँग्रेससचा हात सोडत भाजपचे कमळ हाती घेतले आहे. अशातच आता गोरंट्याल भाजप प्रवेशावर शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी सडकून टीका केली आहे. भाजपच्या जुन्या लोकांनी या बोकड्यापासून सावध रहावे असं खोतकर यांनी म्हटले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
अर्जुन खोतकर यांनी जालन्यातील पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले की, ‘काँग्रेस सोडायचे या माणसाने किती पैसे घेतले, त्याच उत्तर त्याने जनतेला दिलं पाहिजे. गोरंट्याल यांच्या नगर पालिकेतील घोटाळ्याची माहिती भाजप वाल्यांना नसेल. तू तुझ्या घरच्यांना किती त्रास दिला, तुझ्या आईला तू किती त्रास दिला याच्या माझ्याकडे क्लिप आहेत’ असंही खोतकर यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना खोतकर यांनी, ‘हा जनाधार गेलेला नेता आहे. प्रेमविवाह फार काळ टिकत नसतो, प्रेम केलं एकाशी आणि संसार केला दुसऱ्याशी असा हा प्रकार आहे. जुन्या भाजपच्या लोकांनी या बोकड्यापासून सावध रहावे’ असा सल्ला नाव न घेता रावसाहेब दानवे यांना दिला आहे.
कैलास गोरंट्याल यांनी भाजप प्रवेशानंतर बोलताना, मी मुख्यमंत्री फडणवीसांना शिंदेच्या शिवसेनेसोबत युती करु नका, जालना महापालिका स्वबळावर जिंकू असं म्हटलं होतं. यावर बोलताना खोतकर म्हणाले की, ‘तुम्हाला खूप घमंड आहे, आम्ही तुमचा घमंड जिरू. कोणीपण शेंबडा माणूस महापालिका जिंकण्याचा दावा करू शकतो. तुम्ही पाच वर्षात काय काम केलं, याचा हिशोब द्या. बाळासाहेब यांच्या नेतृत्वात आम्ही जालना महापालिकेवर भगवा फडकणार आहोत. आता तू कोणतं ही चिन्ह घेऊन उभं रहा, तुझं डिपॉझिट जप्त होईल’ असंही खोतकर यांनी म्हटलं आहे.
महायुती तुटणार का? यावर बोलताना खोतकर म्हणाले की, महाराष्ट्रात सगळ्यांना आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. देवंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार ही जोडी पक्की आहे, कोणी काही जारी केलं तरी काही होणार नाही.
