9 वेळा जिंकणाऱ्या खासदाराला हरवलं, पहिल्याच टर्ममध्ये संसदेत छाप, कोण आहेत हीना गावित?

MP Heena Gavit |

9 वेळा जिंकणाऱ्या खासदाराला हरवलं, पहिल्याच टर्ममध्ये संसदेत छाप, कोण आहेत हीना गावित?
हीना गावित, भाजप खासदार

मुंबई: मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामुळे काही दिवसांपूर्वी नंदूरबार लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या खासदार हीना गावित (Heena Gavit) यांचे नाव चर्चेत आले होते. मंत्रिमंडळ विस्ताराच्या आदल्या दिवसापर्यंत हीनागावित यांचे नाव मंत्रिपदासाठी आघाडीवर होते. मात्र, ऐनवेळी माशी शिंकली आणि हीना गावित मंत्रिपदाच्या शर्यतीमधून बाहेर फेकल्या गेल्या. मात्र, यानिमित्ताने हीना गावित चांगली कामगिरी करणाऱ्या भाजपच्या खासदारांपैकी एक असल्याचे सिद्ध झाले होते.

हीना गावित या नंदुरबारमधून भाजपच्या खासदार ( heena gavit ) आहेत. डॉ. विजयकुमार गावित यांची कन्या आहेत. हिना गावित या 34 वर्षांच्या आहेत. 2014 मध्ये हिना गावित पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. त्यावेळी हीना गावित या संसदेतील सर्वात तरुण खासदार ठरल्या होत्या. त्यावेळी त्यांचे वय अवघे 26 वर्षे होते.

कोण आहेत हीना गावित?

हीना गावित यांचा जन्म 28 जून 1987 रोजी नंदूरबार येथे झाला. हीना गावित या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आणि भाजपचे विद्यमान नेते विजयकुमार गावित यांच्या कन्या आहेत. पेशाने वैद्यकीय डॉक्टर असणाऱ्या गावित या लोकसभेतील तरुण खासदारांपैकी एक आहेत. त्यांनी MBBS, MD ची पदवी घेतली आहे.

हीना गावित यांचा राजकीय प्रवास

हीना गावित 2014 मध्ये पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. त्यावेळी हीना गावित अवघ्या 26 वर्षांच्या होत्या. मात्र, या निवडणुकीत त्यांनी सलग नऊवेळा लोकसभेची निवडणूक जिंकण्याचा विक्रम असलेल्या काँग्रेसच्या माणिकराव पराभव यांना पराभवाची धूळ चारली होती.

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात 1967 ते 2009 पर्यंत माणिकराव गावित यांनी काँग्रेसला सतत विजय मिळवून दिला होता. मात्र, हीना गावित यांनी पहिल्याच फटक्यात काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला होता.

नंदुरबार जिल्ह्यात डॉ. विजयकुमार गावित यांची कार्यकर्त्यांची स्वतंत्र फौज आहे. त्यांचा शब्द प्रमाण मानत ते ऐनवेळी कोणत्याही पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन निवडणूक रणांगणात उतरतात, असे मानले जाते. त्यांच्या याच फौजेने कन्या डॉ. हीना यांचा लोकसभा विजय सुकर केल्याचे म्हटले जाते. तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही हीना गावित यांनी 90 हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवत नंदुरबारमध्ये भाजपचे वर्चस्व कायम राखले होते.

रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या काळ्या बाजाराविषयी उठवला होता आवाज

मध्यंतरी खासदार हीना गावित यांनी नंदुरबार जिल्ह्यातील रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या काळ्या बाजाराविषयी आवाज उठवला होता. जिल्हाधिकारी आणि रोटरी वेलनेस सेंटरने मिळून रेमडेसिव्हीरचा साठा परस्पर बाहेर विकल्याचा खळबळजनक आरोप गावित यांनी केला होता. या प्रकरणावरून हीना गावित यांनी महाविकासआघाडी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते.

पंतप्रधान मोदींकडून कौतुक

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हीना गावित यांचे कौतुक केले होते. हीना गावित यांनी आदिवासी समाजाच्या समस्या संसदेत मांडल्या होत्या. त्यांचे हे भाषण ऐकून आता मी काय बोलू, असा प्रश्न मला पडला आहे, अशा शब्दात मोदींनी गावित याचं कौतुक केलं होतं. खासदार म्हणून पहिल्याच टर्ममध्ये हीना गावित यांनी संसदेत आपली छाप पाडली होती. पहिल्या टर्ममधील पाच वर्षात हीना गावित या सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या आघाडीच्या खासदारांपैकी एक होत्या. त्यांनी महाराष्ट्रातील ज्येष्ठ खासदारांच्या बरोबरीने राज्याच्या समस्या संसदेत मांडून दाखवल्या होत्या.

Published On - 7:14 am, Fri, 13 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI