BMC च्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे? स्थायी समिती अध्यक्षपदासाठी निवडणूक, शिवसेनेसमोर भाजपसह काँग्रेसचेही आव्हान

काँग्रेसने उमेदवारी मागे घेतली नाही, तर भाजप काँग्रेसला पाठिंबा देऊन सेनेचे वर्चस्व धोक्यात आणू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे

BMC च्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे? स्थायी समिती अध्यक्षपदासाठी निवडणूक, शिवसेनेसमोर भाजपसह काँग्रेसचेही आव्हान

मुंबई : राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेच्या (BMC) वैधानिक समित्यांच्या निवडणुका आजपासून सुरु होत आहेत. सर्वात श्रीमंत महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या अर्थात स्थायी समिती अध्यक्षपद कुणाकडे जाणार याचा फैसला होणार आहे. (BMC Standing Committee Election Shivsena Vs BJP Vs Congress)

सकाळी 11 वाजता शिक्षण समिती, तर दुपारी दोन वाजता स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक आहे. शिक्षण समितीसाठी भाजपकडून सुरेखा पाटील, शिवसेनेकडून संध्या दोषी, तर काँग्रेसकडून संगीता हंडोरे यांनी अर्ज भरले आहेत. स्थायी समितीसाठी भाजपकडून मकरंद नार्वेकर, शिवसेनेकडून यशवंत जाधव आणि काँग्रेसकडून आसिफ झकेरिया मैदानात उतरले आहेत.

निवडणूकीपूर्वी 15 मिनिटांचा वेळ अर्ज मागे घेण्यासाठी दिला जाईल. या 15 मिनिटात काँग्रेस उमेदवारी मागे घेणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे. जर काँग्रेसने उमेदवारी मागे घेतली नाही, तर भाजप काँग्रेसला पाठिंबा देऊन सेनेचे वर्चस्व धोक्यात आणू शकते.

काँग्रेस आणि शिवसेनेची पडद्यामागे हातमिळवणी झाल्याचं बोललं जात आहे. तसंच सर्व समित्यांच्या अध्यक्षपदावर शिवसेनेचाच उमेदवार बसणार, असा विश्वास शिवसेना नेते अनिल परब यांनी व्यक्त केला आहे.

महापालिकेत स्थायी समितीच्या निवडणुकीत उद्या काँग्रेस ऐन वेळी माघार घेईल, असं सूचक वक्तव्य अनिल परब यांनी केलं होतं. तसंच केवळ स्थायी समितीच नाही तर सर्वच समित्यांवर शिवसेनेचाच अध्यक्ष निवडून येईल आणि शिवसेनेचा बीएमसीतील गड अबाधित राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.

काय म्हणाले होते अनिल परब?

राज्यात काँग्रेस आणि शिवसेनेची महाविकास आघाडी आहे, हे भाजपने कायम ध्यानात ठेवलं पाहिजे. त्यामुळे मुंबई महापालिकेत जरी काँग्रेस विरोधी बाकांवर असली, तरी सेनेला त्यांची अडचण नाही, असं अनिल परब यांनी स्पष्ट केलं.

भाजप आधी पहारेकरी होते आणि आता आक्रमक होत आहेत. मात्र शिवसेनेचा जन्मच आक्रमकतेतून झाला आहे, हे कुणीही विसरु नये. मुंबई महापालिकेतील स्थायी समिती आणि इतर सर्व समित्यांच्या अध्यक्षपदी शिवसेनेचाच अध्यक्ष बसणार, असा विश्वास परबांनी व्यक्त केला.

काँग्रेसची नाराजी?

दुसरीकडे, काँग्रेसच्या महापालिकेतील गोटात काही अंशी सेनेबद्दल नाराजीही आहे. आम्हाला शिवसेना विश्वासात घेत नाही म्हणून महापालिकेत राज्यासारखी महाविकास आघाडी होऊ शकली नाही, अशी नाराजी महापालिकेतील विरोधी पक्ष नेते असलेल्या काँग्रेसच्या रवी राजा यांनी बोलून दाखवली होती.

आता तिजोरीच्या चाव्यांसाठी भाजप-काँग्रेस-शिवसेना हे तिन्ही पक्ष मैदानात असल्याने या चाव्या अर्थात स्थायी समिती अध्यक्षपद नेमके कुणाकडे जाणार, यासाठी चुरशीचा सामना होणार आहे. (BMC Standing Committee Election Shivsena Vs BJP Vs Congress)

मुंबई महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल

  • शिवसेना – 92
  • भाजप – 82
  • काँग्रेस – 30
  • राष्ट्रवादी काँग्रेस – 9
  • समाजवादी पक्ष– 6
  • एमआयएम – 2
  • मनसे – 1
  • अभासे – 1

संबंधित बातम्या :

बीएमसी स्थायीसह सात समित्यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक, सेनेसह भाजप, काँग्रेसही रिंगणात; अनिल परबांना विजयाचा विश्वास

(BMC Standing Committee Election Shivsena Vs BJP Vs Congress)

Published On - 8:09 am, Mon, 5 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI