खासगी कामासाठी सरकारी खर्चाने विमान प्रवास, हायकोर्टाने नितीन राऊतांकडे उत्तर मागितले

| Updated on: Jul 15, 2021 | 9:23 AM

लॉकडाऊनच्या काळात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी चार्टर्ड फ्लाईटने खासगी कामासाठी सरकारी पैशान प्रवास केल्याचा दावा भाजप नेते विश्वास पाठक यांनी याचिकेत केला आहे

खासगी कामासाठी सरकारी खर्चाने विमान प्रवास, हायकोर्टाने नितीन राऊतांकडे उत्तर मागितले
Nitin Raut
Follow us on

मुंबई : काँग्रेस नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी लॉकडाऊन काळात खासगी कामासाठी सरकारी पैशाने विमान प्रवास केल्याचा आरोप भाजपने केला होता. या प्रकरणी भाजप नेते विश्वास पाठक (Vishwas Pathak) यांच्या याचिकेला उत्तर देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. नितीन राऊतांना 28 जुलैपर्यंत उत्तर देण्यास हायकोर्टाने सांगितलं आहे. विमान प्रवासासाठी सरकारी तिजोरीतून खर्च केलेली रक्कम परत करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती पाठक यांनी याचिकेत केली आहे.

काय आहे प्रकरण?

सरकारी तिजोरीतून बेकायदा पद्धतीने खर्च केल्याबद्दल भारतीय दंडविधान कलम 406, 409 अन्वये नितीन राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करणारा अर्ज पाठक यांनी मार्च महिन्यात वांद्रे येथील निर्मलनगर पोलीस ठाण्यात दिला होता. लॉकडाऊनच्या काळात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी 12 जून, 2 जुलै, 6 जुलै रोजी मुंबई-नागपूर, तर 9 जुलै रोजी औरंगाबाद, मुंबई, नागपूर , दिल्ली असा चार्टर्ड फ्लाईटने प्रवास केल्याचे माहिती अधिकाराच्या अंतर्गत ‘महानिर्मिती’कडून समजल्याचा दावा पाठक यांनी पत्रकार परिषदेत केला होता.

विश्वास पाठक यांचा आरोप काय?

हा खर्च ऊर्जा खात्याच्या अखत्यारीतील चारही कंपन्यांनी बेकायदा पद्धतीने केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या अनुमतीशिवाय कोणालाही अशा पद्धतीने खासगी विमानाने सरकारी खर्चाने प्रवास करता येत नाही. वीज बिलांची वसुली करण्यासाठी सामान्य माणसाचा वीज पुरवठा तोडणाऱ्या महावितरणकडे मंत्र्याने खासगी कामासाठी केलेल्या विमान प्रवासावर खर्च करण्यासाठी पैसा आहे, अशी टीकाही पाठकांनी केली होती.

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सर्व नियम मोडून हा विमान प्रवास केला असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना तातडीने मंत्रिमंडळातून हटवावे अशी मागणी पाठक यांनी केली होती. विश्वास पाठक यांनी ऊर्जामंत्री राऊत यांच्या विमान प्रवासाच्या खर्चाचा तपशील देणारी कागदपत्रे आणि राऊत यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीची प्रत सादर केली होती.

संबंधित बातम्या :

‘खासगी कामासाठी सरकारी खर्चाने विमानप्रवास करणाऱ्या नितीन राऊतांना मंत्रिमंडळातून काढा’

सर्वसामान्यांची बत्ती गुल, ऊर्जामंत्र्यांची पॉवर फुल, नितीन राऊतांच्या घरातील झगमगटावर भाजप आक्रमक

(Bombay HC asks Power Minister Nitin Raut to file a reply about chartered flight travels by government expenses)