उरलेले दोनचार जणांना टिकवा, नाही तर शिंदे साहेब घेऊन पळतील; बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला

शिवाजी पार्क बाबत न्यायालय जो निर्णय घेईल तो मान्य असायला हवा. मोदी आणि शहा याना बोलावलं असेल तर आनंदच आहे, असंही त्यांनी सांगितलं. समाजामध्ये विश्वास निर्माण करणे हे आमचं काम आहे.

उरलेले दोनचार जणांना टिकवा, नाही तर शिंदे साहेब घेऊन पळतील; बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला
बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 23, 2022 | 1:04 PM

दत्ता कानवटे, औरंगाबाद: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) हे दिलदार नेते आहेत. ते माझे मित्र आहेत. त्यामुळे मला ते भेटले. उद्धव ठाकरेही (uddhav thackeray) आमचे मित्र होते. पण ते शरद पवारांच्या (sharad pawar) नादी लागले. उद्धव ठाकरेंबद्दल एक सांगतो. एक दिवस ते चारच लोक राहतील. माझे कुटुंब, माझी जबाबदारी अशी त्यांची अवस्था होईल. उद्धवजी, तुमचे उरलेले दोन चारजण वाचवा. नाही तर शिंदे साहेब तेही घेऊन पळतील. त्यामुळे टीका करणं सोडा, असा हल्लाबोल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चढवला. ते मीडियाशी संवाद साधत होते.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी शिवसेनेच्या जन आक्रोश मोर्चावरही टीका केली. शिवसेनेला जन आक्रोश मोर्चा काढण्याचा अधिकार नाही. ते इव्हेंट मॅनेजमेट करत आहेत, अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे पक्षात नाराज नसल्याचंही स्पष्ट केलं आहे.

उद्धव ठाकरे घाबरले आहेत. म्हणून मोठी भाषण सुरू आहेत. त्यामुळेच नाराज असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. उद्धव ठाकरे यांनी विचार करून बोललं पाहिजे. अमित शहा आणि उद्धव ठाकरे म्हणजे सूर्यासमोर दिवा आहे, त्यांचं नाव घेऊन बोलू नये, असा इशाराही त्यांनी दिला.

एकनाथ शिंदे यांना पंतप्रधान भेटले की नाहीत यावर तेच उत्तर देतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसेच आम्ही शिंदे गटासोबतच युती करून निवडणूक लढणार आहोत, असंही ते म्हणाले.

शिवाजी पार्क बाबत न्यायालय जो निर्णय घेईल तो मान्य असायला हवा. मोदी आणि शहा याना बोलावलं असेल तर आनंदच आहे, असंही त्यांनी सांगितलं. समाजामध्ये विश्वास निर्माण करणे हे आमचं काम आहे. काँग्रेसने मुस्लिम समाजात भीती केलेली. आम्ही विश्वास निर्माण करण्यासाठी हे करतोय. मुस्लिम समाज आमच्या सोबत आहे, असं ते एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.

मंत्रिपद मिळाले नाही म्हणून शिंदे गट त्यावर नाराज आहे, अशी चर्चा आहे. मात्र यावर त्याबाबतचा अधिकार मुख्यमंत्र्यांना असतो. हा सरकारचा प्रश्न आहे. आमचं काम संघटनेचं आहे. नाराजी आहे हा वाईट प्रचार आहे, असंही ते म्हणाले.