उदयनराजे भोसले भाजपमध्ये दाखल, अमित शाहांच्या उपस्थितीत प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale BJP) यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.

उदयनराजे भोसले भाजपमध्ये दाखल, अमित शाहांच्या उपस्थितीत प्रवेश

नवी दिल्ली :  राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale BJP) यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप अध्यक्ष अमित शाह, जे पी नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उदयनराजे भोसले भाजपमध्ये डेरेदाखल झाले.   रात्री उशिरा दिल्लीत दाखल झालेल्या (Udayanraje Bhosale BJP) राजेंनी रात्री सव्वा वाजता लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन राजीनामा सुपूर्द केला. यावेळी उदयनराजेंसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे सुद्धा उपस्थित होते.

मोदी-शाहा शिवरायांच्या विचाराने कार्यरत – उदयनराजे

दरम्यान, या प्रवेशानंतर उदयनराजेंनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचं कौतुक केलं. काश्मीरमधील कलम 370 हटवण्याचं धाडस मोदींनी दाखवलं. माझ्या लहानपणापासून काश्मीरप्रश्नबद्दल ऐकत होतो, पण कोणीही त्यावर उत्तर शोधत नव्हतं. पण मोदींनी ते धाडस दाखवलं, असं उदयनराजे म्हणाले. मोदी-शाहा शिवरायांच्या विचाराने कार्य करत असल्याचंही उदयनराजेंनी नमूद केलं.

छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाला सर्वधर्म समभावाचा विचार दिला होता. तो आदर्श लोकशाहीसारखा होता. त्यांचं जसं अष्टमंडळ होतं, त्याचाच आधार घेऊन भारतात लोकशाही प्रक्रिया सुरु आहे. या लोकशाहीला अधिक मजबूत करण्यासाठी मोदी आणि शाह यांच्या नेतृत्वात भाजप करत आहे.

भाजप छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना पुढे घेऊन जात आहे. प्रत्येक राज्यात भाजप वाढत आहे. अनेक लोक भाजपशी जोडले जाण्यास इच्छुक आहे. त्यामागे हेच कारण आहे. लहानपणापासून काश्मीरचा विषय होता. मात्र, कुणीही त्याकडं लक्ष दिलं नाही. संपूर्ण देश एक राहावा, भारत मजबूत व्हावा म्हणून मोदींनी महत्त्वाची पाऊलं उचलली. ते निर्णय योग्य आहेत – उदयनराजे भोसले

अमित शाहांच्या उपस्थितीत प्रवेश

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या निवासस्थानी उदयनराजेंचा भाजप प्रवेश प्रवेश झाला. अमित शाह गृहमंत्री झाल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी एखाद्या नेत्याचा भाजप प्रवेश होण्याची ही पहिलीच वेळ आहे. उदयनराजेंच्या पक्षप्रवेशापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उदयनराजे भोसले यांच्यात महाराष्ट्र सदनमध्ये चर्चा झाली.

विधानसभेसोबतच राजेंची पोटनिवडणूक? 

उदयनराजे भोसले यांच्या राजीनाम्यानंतर सातारा लोकसभेसाठी विधानसभेसोबतच पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे.  महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन दिवसात जाहीर होण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे त्यासोबतच उदयनराजेंची पोटनिवडणूक होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

उदयनराजेंची राजकीय कारकीर्द

  • 1996 ला शिवसेनेचे हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक अपक्ष लढली, त्यात उदयनराजेंचा पराभव झाला.
  • 1998 ला शिवेंद्रराजे यांचे वडील अभयसिंहराजे भोसले हे लोकसभेत गेल्यामुळे लागलेल्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजे भोसले यांचा पराभव केला आणि गोपीनाथ मुंडे यांच्या असलेल्या जवळच्या संबंधांमुळे महसूलमंत्री पद मिळालं.
  • 1999 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत अभयसिंहराजे भोसले यांनी उदयनराजे भोसले यांचा पराभव केला.
  • 1999 ला शरद लेवे खून प्रकरणात उदयनराजे यांना अटक झाली
  • 2001 ला उदयनराजे या खून खटल्यातून निर्दोष मुक्त झाले.
  • 2002 ला उदयनराजेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला
  • 2004 च्या विधानसभा निवडणुकीत शिवेंद्रराजेंकडून पराभूत झाले.
  • 2009 च्या लोकसभा  निवडणुकीत उदयनराजेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करून लोकसभा लढवली आणि निवडून आले.
  • 2014 आणि 2019 मध्येही राष्ट्रवादीकडून लोकसभा लढवली आणि निवडून आले.
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *