भाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला

भ्रष्टाचाराची भरपूर घाण तयार झाली आहे. मात्र भाजप वॉशिंग पावडर वापरत नाही. आमच्याकडे विकासाचं डॅशिंग रसायन आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी सुप्रिया सुळेंच्या प्रश्नाला उत्तर दिलं.

भाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला

जळगाव : भाजपकडे अशी कोणती वॉशिंग पावडर आहे? असा सवाल विचारणाऱ्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपकडे वॉशिंग पावडर नसून विकासाचं डॅशिंग रसायन असल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. भुसावळमध्ये महाजनादेश यात्रेवेळी फडणवीस बोलत होते.

‘सर्वप्रथम त्यांच्या पक्षात (राष्ट्रवादी) असलेल्या नेत्यांना वॉशिंगची गरज आहे, हे त्यांनी (सुप्रिया सुळे) मान्य केल्याबद्दल आभार. भ्रष्टाचाराची भरपूर घाण तयार झाली आहे. मात्र भाजप वॉशिंग पावडर वापरत नाही. आमच्याकडे विकासाचं डॅशिंग रसायन आहे. त्या रसायनापुढे सारं काही निष्प्रभ आहे. आणि मोदीजींसारखा नेता आहे’ अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावला.

काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे?

पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांवरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपची फिरकी घेतली होती. ईडी, सीबीआय सारख्या यंत्रणांचा दबावतंत्रासाठी वापर सुरु आहे. आमच्याकडे असताना वाईट असलेले, त्यांच्याकडे गेल्यावर चांगले होतात, भाजपकडे अशी कोणती वॉशिंग पावडर आहे? असा सवाल त्यांनी विचारला होता.

दुसरीकडे, एकनाथ खडसे हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना मंत्रिमंडळात ठेवायचं, की केंद्रात न्यायचं, की राज्यात ठेवायचं, याचा निर्णय मी करत नसतो. त्याबाबतचा निर्णय राष्ट्रीय अध्यक्षच ठरवतील, खडसे आमचे ज्येष्ठ नेते आणि मार्गदर्शक आहेत, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी हात झटकले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *