मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार?, कुणाकुणाला मंत्रिपद मिळणार?; मुख्यमंत्र्यांचं एका वाक्यात उत्तर

नक्षलवाद कमी होत चाललाय. गडचिरोलीचा विकास होतोय. उद्योग सुरु होत आहे. नक्षलवाद संपवण्यात पोलिसांचं मोठं योगदान आहे. शहरी नक्षलवादावर सरकारचं लक्ष आहे.

मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार?, कुणाकुणाला मंत्रिपद मिळणार?; मुख्यमंत्र्यांचं एका वाक्यात उत्तर
मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार?, कुणाकुणाला मंत्रिपद मिळणार?
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Oct 25, 2022 | 12:19 PM

नागपूर: राज्यातील शिंदे सरकारला (shinde government) तीन ते साडेतीन महिने झाले आहेत. या साडेतीन महिन्यात फक्त एकदाच मंत्रिमंडळाचा विस्तार (cabinet expansion) करण्यात आला. अजूनही मंत्रिमंडळाचा संपूर्ण विस्तार करण्यात आलेला नाही. त्यामुळे मंत्रिमंडळात आपल्याला कधी संधी मिळतेय याकडे काही आमदारांचं लक्ष लागलेलं आहे. परंतु, सरकारकडून या विस्तारावर काहीच भाष्य होत नसल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. अशातच आज थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या या प्रतिक्रियेमुळे मंत्रीपदाची आस धरून बसलेल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपुरात आले होते. त्यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर होईल ना. योग्यवेळी सर्व गोष्टी होत राहतात, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. या विस्तारात विदर्भाला स्थान मिळेल का? असा सवालही त्यांना करण्यात आला. त्यावर, मंत्रिमंडळ विस्तारात सर्वांचा विचार केला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

पालकमंत्री असताना माझं विकासांचं टार्गेट होतं. त्यावेली मी दरवर्षी गडचिरोली पोलिसांसोबत दिवाळी साजरी करत होतो. आज मी मुख्यमंत्री आहे. पण गडचिरोलीचा पालकमंत्री असताना सुरू केलेलं काम मी अजूनही सुरू ठेवलं आहे. अतिदुर्गम भागात पोलीस नक्षलवाद्यांशी लढून आपलं संरक्षण करतात. त्यांना दिवाळीचा आनंद घेता यावा हाच उद्देश आहे. आज भामरागड आऊटपोस्टमध्ये पोलिसांसोबत दिवाळी साजरी करणार आहे. त्यामुळे पोलिसांचं मनोबल वाढेल, असं ते म्हणाले.

नक्षलवाद कमी होत चाललाय. गडचिरोलीचा विकास होतोय. उद्योग सुरु होत आहे. नक्षलवाद संपवण्यात पोलिसांचं मोठं योगदान आहे. शहरी नक्षलवादावर सरकारचं लक्ष आहे. जसं या नक्षलवादाचा बिमोड करायचा आहे, तसाच शहरी नक्षलवादाचा बिमोड करायचा आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

काँग्रेस नेते नाना पटोले यांची सरकार बरखास्तीची मागणी हास्यास्पद आहे. कारण आज राज्यात थंपिंग बहूमत असलेलं सरकार आहे. तीन महिन्यात आम्ही 72 मोठे आणि राज्याच्या हिताचे निर्णय घेतले. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला 397 जागा मिळाल्या. भाजप नंबर एकचा पक्ष ठरला. बाळासाहेबांची शिवसेनेला 243 जागा मिळाल्या. आम्ही दुसऱ्या क्रमांकावर राहिलो. हा आकडा आणखी वाढेल. या यशामुळे विरोधकांना धडकी भरली. त्यामुळे टीका होत आहे. विरोधी पक्ष बोलत असतात. बोलू द्या. विरोधी पक्ष टीका करतायत, आम्ही टीकेला कामाने उत्तर देऊ, असं प्रत्युत्तर त्यांनी दिलं.