CM Uddhav Thackeray : या चिमण्यांनो परत फिरा रे! 166 शब्दांचं आवाहन, मुख्यमंत्रीपदाचा उल्लेख टाळला

CM Uddhav Thackeray : आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे. आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत. आपण आजही मनाने शिवसेनेत आहात.

CM Uddhav Thackeray : या चिमण्यांनो परत फिरा रे! 166 शब्दांचं आवाहन, मुख्यमंत्रीपदाचा उल्लेख टाळला
या चिमण्यांनो परत फिरा रे! 166 शब्दांचं आवाहन, मुख्यमंत्रीपदाचा उल्लेख टाळला
Image Credit source: tv9 marathi
भीमराव गवळी

|

Jun 28, 2022 | 3:54 PM

मुंबई: एकनाथ शिंदे (eknath shinde) आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी बंड केल्यानंतर आता शिवसेनेने हे बंड मोडित काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. शिंदे यांच्या बंडानंतर आधी आक्रमक झालेली शिवसेना (shivsena) आता बॅकफूटवर आली आहे. गेल्या आठवड्यात आमदारांना परत येण्याचं आवाहन करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी पुन्हा एकदा या आमदारांना परत फिरण्याचं आवाहन केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा एका निवेदनाद्वारे आमदारांना आवाहन केलं आहे. 166 शब्दांचं हे आवाहन आहे. या आवाहनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या नावापुढे मुख्यमंत्री हा शब्द लावलेला नाही. केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे असं म्हटलं आहे. शिवाय मी तुमचा कुटुंबप्रमुख आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. शिवाय तुम्ही समोर या, बसा चर्चा करू, असं तीनवेळा म्हटलं आहे. शिवसैनिकांमधील संभ्रम दूर करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. तसेच कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका, असंही त्यांनी म्हटलं आहे.

ठाकरेंचं निवेदन जसंच्या तसं

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे गुवाहाटी येथील शिवसेना आमदारांना आवाहन

शिवसैनिक आमदार बांधवानो आणि भगिनींनो

जय महाराष्ट्र !

आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे. आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत. आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत. आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो. कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही, माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण या माझ्या समोर बसा. शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा. यातून निश्चित मार्ग निघेल. आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू. कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका. शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही. समोर आलात बोललात तर मार्ग निघेल. शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे. समोर येऊन बोला आपण मार्ग काढू.

आपला नम्र
उद्धव बाळासाहेब ठाकरे

ठाकरे बॅकफूटवर?

दरम्यान, शिंदे गटाने बंड केल्यानंतर शिवसेनेची भाषा सातत्याने आव्हानाची राहिली आहे. तर शिंदे गटाची भाषा संयमाचीच राहिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंपासून ते संजय राऊतांपर्यंत शिवसेना नेत्यांनी या बंडखोर आमदारांचे बाप काढले आहेत. विमानतळाच्या बाहेर पडू न देण्याची धमकीही दिली आहे. त्यांच्या कार्यालयांची तोडफोडही केली आहे. त्यामुळे शिंदे गट आणि शिवसेनेत प्रचंड वितुष्ट आलं होतं. या पार्श्वभूमीवर आज बंडखोरांनी शिवसेनेला भाजपसोबत युती करण्याची अखेरची डेडलाईन दिली. त्यानंतर उद्धव ठाकरे बॅकफूटवर आले आहेत. त्यामुळेच त्यांनी आवाहन करणारं निवेदन काढल्याचं सांगितलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

बंडखोरांची बैठक

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या निवेदनानंतर गुवाहाटीतील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या निवेदनावरही चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत गेले आहेत. त्यामुळे त्यावरही चर्चा होणार असून काही वेळातच बंडखोरांची अधिकृत भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता बंडखोरांच्या या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें