CM Uddhav Thackeray : समोर या, बसून मार्ग काढू, कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका; उद्धव ठाकरेंचं पुन्हा बंडखोरांना आवाहन

CM Uddhav Thackeray : आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे. आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत. आपण आजही मनाने शिवसेनेत आहात.

CM Uddhav Thackeray : समोर या, बसून मार्ग काढू, कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका; उद्धव ठाकरेंचं पुन्हा बंडखोरांना आवाहन
Image Credit source: tv9 marathi
भीमराव गवळी

|

Jun 28, 2022 | 3:27 PM

मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी 51 आमदारांनी बंड केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकद्वारे बंडखोरांना परत येण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, बंडखोर आमदारांनी मुख्यमंत्र्यांचं हे आवाहन जुमानलं नव्हतं. त्यानंतर शिवसेना नेत्यांनी बंडखोर आमदारांवर अत्यंत कडक भाषेत टीका केली होती. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(cm uddhav thackeray) , शिवसेना नेते संजय राऊत आणि आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी या बंडखोर आमदारांचे बापही काढले होते. त्यामुळे बंडखोर आमदार आणि शिवसेनेत प्रचंड वितुष्ट आलं होतं. त्यानंतरही बंडखोर आमदारांनी आज पुन्हा एकदा शिवसेनेला डेडलाईन दिली होती. भाजपसोबत युती करण्याचं आवाहन बंडखोरांनी केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नरमाईचा सूर आळवला आहे. उद्धव ठाकरे यांनी एक निवेदन जारी केलं आहे. समोर या. चर्चा करू. बसून मार्ग काढू. कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे. आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत. आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत. आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो. कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही, माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण या माझ्या समोर बसा. शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा. यातून निश्चित मार्ग निघेल, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

समोर बसला तर मार्ग निघेल

आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू. कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका. शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही. समोर आलात बोललात तर मार्ग निघेल. शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे. समोर येऊन बोला आपण मार्ग काढू, असं भावनिक आवाहनही ठाकरे यांनी केलं आहे.

हे सुद्धा वाचा

बंडावर कायमच

दरम्यान, बंडखोर आपल्या बंडावर कायम आहे. त्यांनी मागे हटणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती नकोच. भाजपसोबत युती झाली पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करावी. युती करून राज्यात सत्ता स्थापन करावी, असं आवाहन बंडखोर आमदारांनी केलं आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचं हे आवाहन आलं आहे. त्यामुळे त्याला शिवसेनेकडून कसा प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें