संजय राऊतांच्या नाराजीच्या चर्चांवर उद्धव ठाकरे म्हणतात...

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर तब्बल 32 दिवसांनंतर ठाकरे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. मात्र, या सोहळ्याला शिवसेनेचे खासदार संजय राऊत गैरहजर होते.

CM Uddhav Thackeray, संजय राऊतांच्या नाराजीच्या चर्चांवर उद्धव ठाकरे म्हणतात…

मुंबई : “कुणी दिसलं नाही, म्हणजे ते नाराज आहेत असं होत नाही”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांच्या नाराजीच्या चर्चेवर दिली. तसेच,आमदार सुनिल राऊत नाराज असल्याचं अद्याप माझ्यापर्यंत पोहोचलेलं नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. मंत्रिमंडळ विस्तानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना संजय राऊतांच्या नाराजीच्या चर्चांवर प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा “कुणी मंत्रिमंडळ विस्ताराला दिसलं नाही, म्हणजे ते नाराज आहेत असं होत नाही”, असं स्पष्टीकरण उद्धव ठाकरे यांनी दिलं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर तब्बल 32 दिवसांनंतर ठाकरे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. मात्र, या सोहळ्याला शिवसेनेचे खासदार संजय राऊत गैरहजर होते (CM Uddhav Thackeray Press conference).

शिवाय, आमदार सुनिल राऊत यांना मंत्रीपद न दिल्याबद्दल ते नाराज आहेत आणि लवकरच आमदार पदाचा राजीनामा देणार असल्यीचीही चर्चा आहे. यावर ” शिवसेनेमध्ये कुणीही नाराज नाही, माझ्याकडे आतापर्यंत कुणाचीही नाराजी आली नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

येत्या एक-दोन दिवसात खातेवाटप : मुख्यमंत्री

मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुख्यमंत्र्यांनी नवनिर्वाचित मंत्र्यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून सरकारच्या पुढील वाटचालीबाबत माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी खाते वाटपाबाबतही माहिती दिली. “आज महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. येत्या एक-दोन दिवसात खातेवाटप होईल. हे तीन मित्र पक्षांचं सरकार आहे. त्यामुळे पक्षांप्रमाणे खातेवाटप झालं आहे”, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

शेतकरी कर्जमाफीची मर्यादा दोन लाख : मुख्यमंत्री

“शेतकरी पीक कर्जावरुन काही जण वाद उकरत आहेत, महाविकास आघाडीच्या बदनामीच्या प्रयत्न केला जातो आहे”. असा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. शेतकरी कर्जमाफीची मर्यादा पूर्वी दीड लाख होती ती आम्ही दोन लाख केली. कर्जमाफी मिळवण्यासाठीच्या सर्व अटीतटी काढल्या. तसेच, नियमीत कर्ज फेडणाऱ्यांसाठी नवीन योजनाही अंमलात आणली जाणार आहे. आम्ही भिंती रंगवण्याचे प्रकार करत नाही, आम्ही जे काही करतो ते रोखठोक करतो”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

सर्व नियमांनुसार व्हावं इतकीच राज्यपालांची इच्छा होती : मुख्यमंत्री

“उत्साहाच्या भरात आमदारांनी शपथ घेताना आपलं मनोगत व्यक्त केलं. मात्र, सर्व नियमांनुसार व्हावं इतकीच राज्यपालांची इच्छा होती, म्हणून त्यांनी पुन्हा पाडवींना शपथ घ्यायला लावली. ते आमच्यावर नाराज नाहीत”, असं स्पष्टीकरण उद्धव ठाकरे यांनी दिलं.

आता त्यांच्याकडे (भाजप) कामच काय उरलयं : मुख्यमंत्री

भाजपने निमंत्रण असतानाही महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अनुपस्थिती दर्शवली. ठाकरे सरकारवर भाजप नाराज असल्याने भाजप नेते मंत्रिमंडळ विस्ताराला आले नाहीत, असं बोललं जात आहे. त्यावर उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला असता, “सोडा ना… आता त्यांच्याकडे (भाजप) कामच काय उरलयं. ते मुद्दाम वाद उकरुन काढण्याचा प्रयत्न करत आहेत”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपला खोचक टोला लगावला आहे.

ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार

विधानभवन परिसरात महाविकास आघाडीच्या 36 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 36 आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली. यामध्ये 26 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. विस्तारामध्ये राष्ट्रवादीच्या 14, शिवसेनेच्या 12, तर काँग्रेसच्या 10 मंत्र्यांनी शपथ घेतली. अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक, आदित्य ठाकरे यांच्यासह 36 मंत्र्यांचा शपथविधी झाला. यावेळी मंत्र्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. (Thackeray Govt Cabinet Expansion Live)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *