आव्हाडांचा बंगला देऊन वडेट्टीवारांच्या नाकदुऱ्या, तरीही नाराजी कायम

| Updated on: Jan 08, 2020 | 9:43 AM

विजय वडेट्टीवार यांना अखेर मर्जीतला 'ब 1' बंगला बहाल करण्यात आला. तर जितेंद्र आव्हाड यांना आता 'ब 1' ऐवजी 'ब 5' बंगल्याचं वाटप केलं जाणार आहे.

आव्हाडांचा बंगला देऊन वडेट्टीवारांच्या नाकदुऱ्या, तरीही नाराजी कायम
Follow us on

नागपूर : ठाकरे मंत्रिमंडळातील काँग्रेसचे नाराज मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नाकदुऱ्या काढण्याचे हरतऱ्हेचे प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना दिलेला ‘ब 1’ बंगला देऊन विजय वडेट्टीवार यांची समजूत (Vijay Wadettiwar Bungalow changed) काढण्यात आली. मात्र तरीही वडेट्टीवारांची नाराजी कायम आहे.

विजय वडेट्टीवारांना ओबीसी, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भूकंप पुनर्वसन या खात्यांचं कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं आहे. मात्र मंत्रिमंडळातील ही दुय्यम खाती मिळाल्यामुळे विजय वडेट्टीवार नाराज असल्याची चर्चा आहे.

वडेट्टीवारांनी मंत्रिमंडळ विस्तारानंतर झालेल्या पहिल्या बैठकीला दांडी मारली होती. पदभारही न स्वीकारल्यामुळे त्यांची नाराजी दिसून आली होती. वडेट्टीवार आग्रही असलेला बंगलाही आव्हाडांच्या वाट्याला गेल्यामुळे नाराजीत भर पडली होती.

विजय वडेट्टीवार यांना अखेर मर्जीतला ‘ब 1’ बंगला बहाल करण्यात आला. तर जितेंद्र आव्हाड यांना आता ‘ब 1’ ऐवजी ‘ब 5’ बंगल्याचं वाटप केलं जाणार आहे. यासंबंधी सरकारचा आदेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे वडेट्टीवारांची समजूत घालण्यासाठी काय कसरत करावी लागते, हा प्रश्न महाविकास आघाडीतील वरिष्ठांना पडला आहे.

विजय वडेट्टीवार भाजपात आलेच तर त्यांचे स्वागत आहे. वडेट्टीवार यांच्यावर अन्याय झाला आहे, असं काल माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते. त्यामुळे वडेट्टीवार काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कोण आहेत विजय वडेट्टीवार?

  • विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे चंद्रपुरातील ब्रम्हपूरचे आमदार आहेत.
  • काँग्रेसचे विधानसभेतील ओबीसी समितीचे ते सदस्य आहेत
  • विजय वडेट्टीवार यांनी 80 च्या दशकात एनएसयूआयमधून राजकीय कारकीर्द सुरु केली
  • 1991 ते 93 दरम्यान ते गडचिरोली जिल्हा परिषदेचे सदस्य होते.
  • 1998 ते 2004 या दरम्यान त्यांनी विधानपरिषदेची आमदारकी भूषवली.
  • 2004 मध्ये ते चंद्रपुरातील चिमूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले.
  • 2008 -09 मध्ये त्यांनी जलसंपदा राज्यमंत्रिपद भूषवलं होतं. शिवाय ते आदिवासी विकास, पर्यावरण आणि वन राज्यमंत्रीही होते.
  • 2009-10 मध्ये ते पुन्हा चिमूरमधून निवडून आले.
  • 2010 मध्ये अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात त्यांना पुन्हा विविध खात्यांचं राज्यमंत्रिपद मिळालं.
  • 2014 मध्ये वडेट्टीवार पुन्हा ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून भरघोस मतांनी निवडून आले.
  • 24 जून 2019 रोजी त्यांची निवड महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपदी झाली.

Vijay Wadettiwar Bungalow changed