‘आता शिंदेंना संपवून एक नवीन उदय…’, काँग्रेस नेत्याच खूप मोठं सूचक वक्तव्य
पहाटेचा शपथविधी हे अजितदादांविरोधात षडयंत्र होतं, दादांनी जाऊ नये असं मी म्हटलं होतं, असं धनंजय मुंडे काल म्हणाले. त्यावर विजय वडेट्टीवार म्हणाले की, "अंगावर आल्यावर सगळ्यांना आठवतं. त्यावेळेस का नाही आठवलं?. पुढाकार कोणी घेतला? दादांनंतर सोबत नेणारा पहिला माणूस धनंजय दिसत होता. त्यामुळे आता चुका आठवायला लागल्या आहेत"

“सगळी परिस्थिती पाहून सरकारला जनता स्थगिती देईल असं वाटायला लागलय. इतकं मोठ बहुमत मिळालं, तुम्ही सांगत होता. स्वातंत्र्यानंतर कधीच मिळालं नव्हतं. आपसातले मतभेद, भांडण इतकी वाढली आहेत की, सत्तेसाठी, खुर्चीसाठी भांडण. त्यातून पैसा मिळवण्याची स्पर्धा सुरु आहे. पालकमंत्री नेमताना, मंत्री नेमताना भांडण. नांदा सौख्य भरे तसं आता भांडा सौख्यभरे म्हण्याची वेळ आली आहे” अशा शब्दात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर निशाणा साधला. पालकमंत्री वाटपावरुन महायुतीमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. “भांडा आणि महाराष्ट्राच वाटोळ करां. आता पालकमंत्री बदललेत. उद्या मंत्री बदलायची पाळी येईल. परवा उपमुख्यमंत्री नंतर मुख्यमंत्री बदलायची पाळी येईल. बदला आणि महाराष्ट्राच वाटोळं करा” अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधला.
पालकमंत्री पदाच्या वाटपावरुन एकनाथ शिंदे नाराज आहेत, ते दरेगावला निघून गेलेत असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर वडेट्टीवार म्हणाले की, “तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करेमना. नाराजी दाखवून काही पदरात मिळेल, एवढा विषय आहे. आमच्या शिंदे साहेबांची आजच्या राजकारणातील स्थिती बिकट आहे” असं वडेट्टीवार म्हणाले. विजय वडेट्टीवार यांनी यावेळी एक खूप मोठ वक्तव्य केलं.
‘कारण ते दोन्ही दगडावर हात मारुन आहेत’
“मी शब्द वापरला, तर चुकीचा अर्थ निघेल. शिंदे साहेबांची गरज संपली का? आणि ते बाजूला व्हावेत, मला भिती वाटते की, उद्धवजींना संपवून शिंदेजींना आणलं. आता शिंदेंना संपवून एक नवीन उदय पुढे येईल. तो उदय कुठला असेल?. त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल. ही सुद्धा स्थिती महाराष्ट्रात येईल” असं ते म्हणाले. त्यावर पत्रकारांनी त्यांना विचारलं की, तुम्ही उदय सामंत यांच्याबद्दल बोलत आहात का?. “तुम्हाला उद्या शिवसेनेत तिसरा नवीन उदय दिसेल. ही शक्यता नाकारता येत नाही. कारण ते दोन्ही दगडावर हात मारुन आहेत” असं वडेट्टीवार म्हणाले.
‘पंकजा मुंडेंना दु:ख करुन मिळणार तरी काय?’
पंकजा मुंडे म्हणाल्या की, बीडच पालकत्व मिळालं असतं, तर आनंद झाला असता, त्यावर विजय वडेट्टीवार म्हणाले की, “त्यांनी अधिकच दु:खही करु नये. दु:ख करुन मिळणार तरी काय?. महाराष्ट्रात ओबीसींची मत घेऊन सत्तेवर आले. पण ओबीसी नेत्यांना नेतृत्वहीन करण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरु आहेत”