लोकांचा शाप लागल्यामुळे अमित शाहांना स्वाईन फ्लू : काँग्रेस खासदार

लोकांचा शाप लागल्यामुळे अमित शाहांना स्वाईन फ्लू : काँग्रेस खासदार

बंगळुरु : काँग्रेसचे कर्नाटकातील राज्यसभा खासदार बीके हरीप्रसाद यांनी भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलंय. अमित शाह यांना स्वाईन फ्लू झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अमित शाह यांनी कर्नाटकातील सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांना लोकांचा शाप लागलाय, असं हरीप्रसाद म्हणाले.

कर्नाटकमध्ये आणखी हस्तक्षेप केला तर त्यांची (अमित शाह) प्रकृती आणखी खराब होईल. कर्नाटक सरकारला डळमळीत करण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांना लोकांचा शाप लागलाय. आमच्या अध्यक्षांबाबतही ते चुकीचं बोलतात, असं वक्तव्य हरीप्रसाद यांनी केलं. हरीप्रसाद हे काँग्रेसकडून राज्यसभा उपसभापतीच्या निवडणुकीत उमेदवार होते. त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला होता.

भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी स्वाईन फ्लू झाल्यामुळे त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती सध्या चांगली असून त्यांना शुक्रवारी डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. अमित शाह यांनी स्वतःच आपण आजारी असल्याची माहिती दिली होती. शिवाय भाजपनेही शाह यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती गुरुवारी दिली.

अमित शाह यांना डोकेदुखी आणि श्वसनासह इतर गोष्टींचाही त्रास होत होता. तज्ञ डॉक्टरांनी त्यांना एच वन एन वन टेस्ट करण्याचा सल्ला दिला. ही टेस्ट केल्यानंतर स्वाईन फ्लू झाला असल्याचं निदान झालं. यानंतर बुधवारी रात्री अमित शाह यांना एम्समध्ये भरती करण्यात आलं.

दरम्यान, काँग्रेस खासदाराच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर निंदा केली जात आहे. भाजपनेही यावर टीका केला. रेल्वेमंत्री पियुष गोयल म्हणाले, की बीके हरीप्रसाद यांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलंय, ते काँग्रेसची पातळी दाखवतं. फ्लूचा उपचार आहे, पण काँग्रेस नेत्यांच्या मानसिक आजाराचा उपचार अशक्य आहे, असं ट्वीट पियुष गोयल यांनी केलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI