करीम लाला-इंदिरा गांधी भेटीविषयीचं वक्तव्य मागे घ्या, देवरा-निरुपम यांचं एकमत

मी संजय राऊत यांच्याकडे इंदिरा गांधींविषयी चुकीची माहिती देणारं वक्तव्य मागे घेण्याची मागणी करतो, असं ट्वीट मिलिंद देवरा यांनी केलं आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:14 AM, 16 Jan 2020
करीम लाला-इंदिरा गांधी भेटीविषयीचं वक्तव्य मागे घ्या, देवरा-निरुपम यांचं एकमत

मुंबई : कुख्यात गुंड करीम लाला आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भेटीविषयीचं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मागे घ्यावं, अशी मागणी काँग्रेस नेते मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांनी केली आहे. इतर वेळी एकमेकांच्या विरोधात बोलणाऱ्या देवरा आणि निरुपम यांचं या विषयावर मात्र एकमत (Congress on Sanjay Raut Statement on Karim Lala) झालं.

‘इंदिराजी या खऱ्या देशभक्त होत्या. त्यांनी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेशी कधीच तडजोड केली नाही. मुंबई काँग्रेसचा माजी अध्यक्ष या नात्याने मी संजय राऊत यांच्याकडे चुकीची माहिती देणारं वक्तव्य मागे घेण्याची मागणी करतो’ असं ट्वीट मिलिंद देवरा यांनी केलं आहे. ‘राजकीय नेत्यांनी दिवंगत पंतप्रधानांविषयी बोलण्यापूर्वी संयम दाखवला पाहिजे’ असंही देवरा म्हणाले.

संजय निरुपम यांनीही संजय राऊत यांना शेरोशायरीच करण्याचा सल्ला दिला आहे. ‘शिवसेनेच्या श्रीयुत शायरांनी इतरांच्या हलक्या-फुलक्या शायरी ऐकवत महाराष्ट्राचं मनोरंजन करणंच चांगलं राहील. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविषयी अपप्रचार केलात, तर पश्चातापाची वेळ येईल. काल त्यांनी इंदिरा गांधींविषयी जे वक्तव्य केलं, ते मागे घ्यावं’ असं संजय निरुपम यांनी ट्वीट केलं आहे.

कुख्यात गुंड करीम लाला याला भेटण्यासाठी इतर नेते जसे जात होते, तसं इंदिरा गांधीही भेटत होत्या, असं संजय राऊत मुलाखतीत म्हणाले होते. त्यावरही संजय राऊत यांनी दुसऱ्या दिवशीच्या पत्रकार परिषदेत पुन्हा स्पष्टीकरण दिलं. देशातील अनेक नेते करीम लाला याला भेटत होते. करीम लाला पठाण संघटनेचा अध्यक्ष होता. या संघटनेला अनेक नेते भेट देत होते. इंदिरा गांधींबद्दल माझ्याएवढा आदर कुणी दाखवला नाही. इंदिरा गांधींवर टीका झाली त्यावेळी काँग्रेसवालेही शांत होते, असं संजय राऊत म्हणाले. Congress on Sanjay Raut Statement on Karim Lala

संबंधित बातम्या :

तंगडे तोडण्याची भाषा बोलू नका, तंगड्या सर्वांना, उदयनराजेंच्या ‘मातोश्री’ही शिवसेनेच्या उमेदवार होत्या : संजय राऊत