काँग्रेसला मोठा धक्का, ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठी बातमी
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे, आता काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आणखी एका नेत्यानं काँग्रेसची साथ सोडली आहे.

राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराला देखील वेग आला आहे. राज्यात निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक आयोगानं जाहीर केल्यानुसार येत्या 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान आता महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून, अनेक पक्षांनी आपले उमेदवार देखील जाहीर केले आहेत. या पार्श्वभूमीवर सोलापुरातून मोठी बातमी समोर आली असून, काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. ज्या उमेदवाराला उमेदवारी दिली, त्यानेच एमआयएममध्ये प्रवेश केला आहे.
सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसने महापालिका निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या उमेदवाराच्या पहिल्या यादीतील उमेदवारानेच आता थेट एमआयएममध्ये प्रवेश केला आहे. सोलापुरातील प्रभाग 16 च्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार आणि माजी नगरसेविका फिरदोस पटेल यांनी एमआयएममध्ये प्रवेश केला आहे. एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष फारुख शाब्दी यांच्या उपस्थितीत फिरदोस पटेल यांनी एमआयएममध्ये प्रवेश केला.
फिरदोस पटेल या काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. 2017 मध्ये सोलापूर महापालिकेत काँग्रेसच्या तिकिटावर त्या निवडून आल्या होत्या. काँग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेताना अपमानस्पद वागणूक दिल्याचा आरोप यावेळी फिरदोस पटेल यांनी केला आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश मिळालं होतं, विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला. नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीपूर्वी देखील हेच चित्र पहायला मिळालं होतं. आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील महाविकास आघाडीमधून महायुतीमध्ये अनेक पक्षप्रवेश होत असल्याचं पहायला मिळत आहे. ही गळती थांबवण्याचं मोठं आव्हान महाविकास आघाडी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटासमोर असणार आहे. तर दुसरीकडे ऐन वेळी प्रवेश केलेल्यांना तिकीट मिळत असल्यानं सर्वच पक्षातील निष्ठावंत नाराज आहेत.
