पुण्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या, अजित पवारांनी अधिकाऱ्यांना बजावलं, म्हणाले, ‘या सूचनांचं पालन झालंच पाहिजे!’

कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे, असं अजित पवार म्हणाले. | AJit pawar

पुण्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या, अजित पवारांनी अधिकाऱ्यांना बजावलं, म्हणाले, 'या सूचनांचं पालन झालंच पाहिजे!'
अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे कौन्सिल हॉल येथे बैठक

पुणे : कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे, असं सांगत यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करा. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सूक्ष्म नियोजन करा. शहर व ग्रामीण भागात हॉटस्पॉटनिहाय अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवा. सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रात प्रभावी उपाययोजना राबवा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. (DCM Ajit pawar Meeting In Pune Council hall over Increasing Corona patient)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील कौन्सिल हॉलला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मंत्री दिलीप वळसे-पाटील, मंत्री दत्तात्रय भरणे, खासदार गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, खासदार वंदना चव्हाण, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, तसंच विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख उपस्थित होते.

अजित पवारांनी अधिकाऱ्यांना कोणत्या सूचना दिल्या…?

कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करा.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सूक्ष्म नियोजन करा.
शहर व ग्रामीण भागात हॉटस्पॉटनिहाय अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवा.
सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रात प्रभावी उपाययोजना राबवा
संपर्क शोध मोहीम (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) अधिक प्रभावीपणे राबवा.
शासकीय आणि खाजगी प्रयोगशाळांमध्ये पूर्ण क्षमतेचा वापर करुन नमुना तपासण्या वाढवा.
आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गृहभेटीद्वारे सुपर स्प्रेडर व सारी रुग्णांचे सर्वेक्षण करा
संसर्ग रोखण्यात खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची भूमिका महत्त्वाची आहे. यासाठी त्यांनी फ्लू सदृश रुग्णांची तपासणी करुन घ्यावी.

उपमुख्यमंत्र्यांनी नागरिकांसाठी कोणत्या सूचना केल्या?

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी गर्दीत जाणे टाळणे, सामाजिक अंतर पाळणे, मास्क, सॅनिटायझरचा वापर आदी प्रशासनाने घालून दिलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, 200 व्यक्तींच्या मर्यादेत लग्न, कौटुंबिक व राजकीय कार्यक्रम होतील याची दक्षता घ्या. जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालये २८ फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवावीत. मात्र अभ्यासिका निम्या क्षमतेने नियम पाळून सुरू राहतील याची खात्री करा. हॉटेल, बार रात्री ११ पर्यंतच सुरु राहतील याची दक्षता घ्या, असे सांगून रात्री 11 ते सकाळी 6 दरम्यान नियंत्रित संचाराची अंमलबजावणी करा, असं ते म्हणाले.

वृत्तपत्र, दूध, भाजीपाला, फळे, औषधे या अत्यावश्यक सेवांना सूट द्या. जिल्ह्यात सर्वत्र कोविड केअर सेंटर तात्काळ सुरु करा. मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. आरोग्य व्यवस्था सक्षम होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना गतीने करा, असे सांगून ससून रुग्णालयाला आवश्यक मनुष्यबळ व यंत्र सामुग्री पुरविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

(DCM Ajit pawar Meeting In Pune Council hall over Increasing Corona patient)

हे ही वाचा :

ठरलं ! मुख्यमंत्री महाराष्ट्राशी रात्री 7 वाजता बोलणार, लॉकडाऊनचा संभ्रमही दूर करणार?

LIVE | अमरावती शहरात 12 प्रतिबंधित क्षेत्र जाहीर, मनपा आयुक्तांकडून प्रतिबंधीत क्षेत्राची पाहणी

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI