भुजबळसाहेब, तुमच्यासकट पुन्हा येईन : देवेंद्र फडणवीस

आमचा डीएनए विरोधीपक्षाचा आहे, हे बाळासाहेब थोरातांनी सांगितलं ते बरोबरच आहे. कारण ते आमच्यासाठी सहज आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले

भुजबळसाहेब, तुमच्यासकट पुन्हा येईन : देवेंद्र फडणवीस
अनिश बेंद्रे

|

Dec 01, 2019 | 3:54 PM

मुंबई : मी पुन्हा येईन असं मी निश्चितच म्हणालो, पण वेळ सांगितली नव्हती, असा डायलॉग विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन प्रस्तावाला उत्तर देताना मारला. त्याचवेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना उद्देशून, भुजबळ साहेब, इतकं घाबरु नका, बरं पुढच्या वेळी आलो, तर तुमच्यासकट येतो बास? कारण राजकारणात काहीही अशक्य नाही, अशी कोपरखळी फडणवीस यांनी मारताच सभागृहात एकच हशा पिकला. विधानसभेच्या विरोधीपक्ष नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात फडणवीस (Devendra Fadnavis to Chhagan Bhujbal) बोलत होते.

‘उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री म्हणून अभिनंदन करण्याची इच्छा होती, मात्र दुर्दैवाने ती करता आली नाही. गेली अनेक वर्ष ज्यांच्यासोबत काम करत आहोत, त्या उद्धव ठाकरेंना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा आहेत, काही कारणाने संबंध मागेपुढे झाले, पण राजकारणापलिकडे त्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांनी मनात ज्या काही योजना तयार केल्या आहेत, जे जनतेच्या हिताचं असेल, त्या पूर्ण करण्यासाठी विरोधी पक्ष म्हणून निश्चित सहकार्य करु’ असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

‘आमचा डीएनए विरोधीपक्षाचा आहे, हे बाळासाहेब थोरातांनी सांगितलं ते बरोबरच आहे. कारण ते आमच्यासाठी सहज आहे. ज्यांनी मला विरोधीपक्षात काम करताना पाहिलं, ते निश्चितच सांगतील की मी नियमांच्या पुस्तकाच्या बाहेर गेलो नाही. काल माझे मुद्दे संविधानाच्या तरतुदीनुसार होते. अध्यक्षांचा निर्णय अंतिम असतो, त्यावर चर्चा करणार नाही. पण विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर आम्ही समाधानी नव्हतो, म्हणून आम्ही बहिर्गमन केलं, मात्र त्या प्रसंगाचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. मी पुन्हा एकदा विरोधी पक्षनेता म्हणून सांगतो, की नियमांचे पुस्तक आणि संविधान यापलिकडे जाऊन मी कुठलाही मुद्दा रेटून नेणार नाही’ असं स्पष्टीकरण फडणवीसांनी (Devendra Fadnavis to Chhagan Bhujbal) दिलं.

‘मी शपथेचा जो मुद्दा मांडला, त्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. कुठल्याही महापुरुषाचं नाव घ्यायला मनाई नाही. आम्ही इथे आलो, ते छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेऊन, आम्ही कधीही राजे झालो नाही, कायम सेवकच राहू. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव असेल, सकाळी उठताना त्यांचं नाव घ्या, झोपताना घ्या, दिवसातून 25 वेळा, शंभर वेळा घ्या, ही नावं वंदनीयच आहेत. परंतु त्याच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या अनुसूचीमध्ये शपथ कशी घ्यावी, हे दिलं आहे. त्यानुसार झाली, तरच शपथ मानली जाते, अन्यथा ती मानली जात नाही. त्यामुळे बाबासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार तेव्हाच असतो, जेव्हा त्यांनी दिलेल्या नियमांचं पालन होतं’ असं फडणवीस म्हणाले. त्यानंतर अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी शपथ घेताना झालेल्या चुकीचा दाखलाही फडणवीसांनी दिला.

काल जे विरोधात होते ते एकत्र आले आहेत. आम्ही 70 टक्के जागा जिंकून मेरिटमध्ये आलो. परंतु राजकारणात केमिस्ट्री नाही, तर पॉलिटिकल अरिथमॅटिक (राजकीय अंकगणित) चालते, त्यामुळे 40 टक्के मिळालेले तिघे एकत्र आले, त्यांनी 120 केले आणि लोकशाहीमध्ये त्यांनी मेरिटची जागा घेतली, असा टोला फडणवीसांनी लगावला.

‘मी निश्चितपणे सांगितलं होतं, की मी परत येईन. वाईट वाटण्याचं कारणच नाही. अभिनंदनाचे ठराव म्हणजे ‘शोले’ चित्रपटासारखे होते. अमिताभ बच्चन धर्मेंद्रचं लग्नात जसं कौतुक करतो, ‘लडका तो अच्छा है’ अशी डायलॉगबाजी फडणवीसांनी केली. महाराष्ट्राच्या जनतेने मला परत आणलं, 105 निवडून दिलं, सर्वात मोठा पक्ष, जनादेश तोच होता. त्याचा सन्मान आम्ही ठेवू शकलो नाही. मी पुन्हा येईन, पण वेळ सांगितली नव्हती, त्यामुळे वाट बघा’ असंही फडणवीस म्हणाले.

मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा देना मै समंदर हू, लौटकर वापस आऊंगा

अशी शायरी देवेंद्र फडणवीस यांनी पेश करताच ‘भारत माता की जय,’ ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी सभागृह दणाणलं. त्यानंतर विरोधीपक्ष नेत्यांची परंपरा देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली.

आपण एखादी भूमिका मांडतो, ती व्यक्तीच्या नाही, तर पद, धोरण किंवा कामाच्या विरोधात असते. त्यामुळे विनाकारण किंवा विनापुरावा मी कोणावरही आरोप आणि बदनामी करणार नाही. या पदाची उंची वाढली पाहिजे.

भुजबळ साहेब, इतकं घाबरु नका, बरं पुढच्या वेळी आलो, तर तुमच्यासकट येतो बास? कारण राजकारणात काहीही अशक्य नाही, जिथे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले, तिथे काहीही अशक्य नाही, असं फडणवीस अखेरीस (Devendra Fadnavis to Chhagan Bhujbal) म्हणाले.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें