तरुणांना सभेला सोडा, जनतेची भीती आम्हाला नाही, तर मुख्यमंत्र्यांना : धनंजय मुंडे
जनतेची भीती आम्हाला नाही, तर मुख्यमंत्र्यांना असेल. त्यामुळे सभेला आलेल्या तरुणांना आत येऊ द्या, अशा शब्दात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पोलिसांना खडसावले. यातून त्यांनी मुख्यमंत्र्यांवर देखील निशाणा साधला. ते माजलगाव येथे शनिवारी (24 ऑगस्ट) आयोजित केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेत बोलत होते.

बीड : जनतेची भीती आम्हाला नाही, तर मुख्यमंत्र्यांना असेल. त्यामुळे सभेला आलेल्या तरुणांना आत येऊ द्या, अशा शब्दात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पोलिसांना खडसावले. यातून त्यांनी मुख्यमंत्र्यांवर देखील निशाणा साधला. ते माजलगाव येथे शनिवारी (24 ऑगस्ट) आयोजित केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेत बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेत मोठ्या प्रमाणात तरुणांची गर्दी उसळली होती. धनंजय मुंडेंना भेटण्यासाठी, भाषण ऐकण्यासाठी ही तरुणाई स्टेजजवळ येण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, सुरक्षेचे कारण देत पोलिसांनी त्यांना प्रवेश द्वारावरच अडवून ठेवले. त्यावेळी मुंडेंनी जनतेची भीती आम्हाला नाही, तर मुख्यमंत्र्यांना असेल, असं म्हणत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत सुरक्षेच्या कारणावरून प्रत्येक ठिकाणी नागरिकांना स्थानबद्ध केले जात आहे. धर्मा पाटील यांच्या 69 वर्षीय पत्नीलाही स्थानबद्ध करण्यात आले होते. याचा संदर्भ घेत जनतेची भीती तुमच्या मुख्यमंत्र्यांना असेल, आम्हाला नाही. आम्ही जनतेतील नेते आहोत. सभेला येणाऱ्या एकाही माणसाला अडवू नका, अशा सूचना धनंजय मुंडेंनी पोलिसांना दिल्या.
मुंडे यांचा हा रुद्रावतार पाहून कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच जोश आला. पाहता पाहता समोरचा रिकामा भाग गर्दीने भरून गेला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत जागा मिळवून दिल्याबद्दल आपला आनंद व्यक्त केला.
