‘मोदी तेरे से बैर नही, लेकिन डॉ. भामरे की खैर नही’

‘मोदी तेरे से बैर नही, लेकिन डॉ. भामरे की खैर नही’


धुळे : संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष  भामरे यांना हरवण्यासाठी शिवसेनेचा धुळ्यातील एक गट सध्या काँग्रेससोबत असल्याचे चित्र आहे. ‘मोदी तेरे से बैर नही, लेकिन डॉ. भामरे की अब खैर नही’ असा नारा देत शिवसेनेच्या एका गटाकडून काँग्रेसच्या उमेदवाराला अप्रत्यक्ष साथ देण्यात येत आहे. त्यामुळे धुळे लोकसभा निवडणूक मोठी चुरशीची ठरणार आहे. भाजपने या ठिकाणी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. भाजपकडून या मतदारसंघात डॉ. सुभाष भामरे रिंगणात आहेत, तर त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील निवडणूक आखाड्यात आहेत.याशिवाय सुभाष भामरे यांचे कट्टर विरोधक अनिल गोटे यांनीही भाजपचा राजीनामा देऊन अपक्ष अर्ज दाखल केला आहे.

धुळे मतदारसंघात बागलाण, मालेगाव, मालेगाव मध्य, शिंदखेडा, धुळे शहर, धुळे ग्रामीण यांचा समावेश आहे. दरम्यान, आमदार अनिल गोटे यांनीही भाजपला रामराम ठोकत सोमवारी डॉ. भामरे यांना पाडण्यासाठी सभा घेतली. त्यामुळे भामरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अनिल गोटे यांनी भाजप सोडताना आपल्या आमदारकीचाही राजीनामा दिला.

काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते सुभाष देवरे यांचा भाजपमध्ये प्रवेश

डॉ. भामरे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, शिक्षण मंत्री विनोद तावडे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज भरला. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून पायी रॅली काढत भाजपने शक्ती प्रदर्शन केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या हुबेहुब दिसणाऱ्या व्यक्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांचे मामा आणि एकेकाळचे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते सुभाष देवरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. शिवसेना- भाजप उत्तर महाराष्ट्रात 8 जागा लढवत आहेत. या सर्व 8 जागांवर युतीचा विजय होईल, असा विश्वास भाजप नेते गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

‘अनिल गोटेंनी आता आपले डिपॉझिट वाचवून दाखवावे’

यावेळी गिरीश महाजन म्हणाले, डॉ. भामरे हे लाखोंच्या मताधिक्याने निवडून येतील हा आम्हाला विश्वास आहे. आमदार गोटे आता भाजपमध्ये नाहीत. त्यांनी आता त्यांचे डिपॉझिट वाचवून दाखवावे.

दरम्यान, काँग्रेस उमेदवार कुणाल पाटील यांनीही सोमवारी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. त्याशिवाय अनिल गोटे यांनीही आजच उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे आता धुळ्यातील लढत तिरंगी होणार असल्याचे चित्र आहे. गोटे किती मते घेतात? डॉ. भामरे यांचा किती प्रभाव पडतो? आणि कुणाल पाटील किती मते घेतात? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

गोटे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना आपली नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री  फडणवीसांनी माझी फसवणूक केली आहे. मोदींना माझा विरोध नाही, परंतु त्यांच्याखाली असलेल्या या गर्दीला माझा विरोध आहे, असेही त्यांनी सांगितले.

पाहा व्हिडीओ:

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI