डॉ. हिना गावितांना उमेदवारी नको, मराठा मोर्चाची मागणी

डॉ. हिना गावितांना उमेदवारी नको, मराठा मोर्चाची मागणी

नंदुरबार: नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराची वाट बिकट असल्याचे चित्र आहे. भाजपने खासदार डॉ. हिना गावितांना उमेदवारी देऊ नये, यासाठी धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना निवेदन देण्यात आलं आहे.  भाजपने हिना गावित यांना उमेदवारी दिल्यास विरोधात प्रचार करणार असल्याचा इशाराही मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात खासदार डॉ हिना गावित यांना प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. धनगर समाजाला आदिवासी समाजाप्रमाणे देऊ केलेल्या सेवा-सुविधांमुळे नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी नाराज झाले आहेत. शासनाच्या या निर्णयाविरोधात मोर्चेही निघाले आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेसने आदिवासींची बाजू घेतली.

त्यानंतर आता मराठा क्रांती मोर्चाने धुळ्यातून डॉ हिना गावित यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे. भाजपने डॉ गावित यांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी मराठा मोर्चाने केली आहे. या मागणीचे निवेदनही भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पाठवलं आहे. विशेष म्हणजे डॉ गावित यांना उमेदवारी दिली, तर विरोधात प्रचार करण्याचा इशाराही मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.

राज्य सरकारने धनगर समाजाबाबत घेतलेली भूमिकाही नंदुरबारमध्ये डॉ गावित कुटुंबियांना अडचणीत आणणारी ठरू शकते. शासनाचा हा निर्णय डॉ गावितांना मारक ठरणार आहे. पक्षाविरोधात भूमिका घेता येत नाही आणि आदिवासी समाजाच्या हक्कांवर होणारं आक्रमण मुकाट पाहावे लागत असल्यामुळे, डॉ गावित कुटुंबीयांची कोंडी झाली आहे.

भाजपाला बिकट वाट असताना काँग्रेसला याचा अपेक्षित लाभ घेता येत नसल्याचं चित्र आहे. भाजपमध्ये आपल्याशिवाय अन्य कोणीही उमेदवारीचा दावा केला नसल्याचे डॉ हिना गावित यांनी स्पष्ट केल्याने, त्यांना उमेदवारी निश्चित आहे. पण सद्यस्थिती पाहता हिना गावित यांची वाट खडतर आहे. येत्या निवडणुकीत विजयासाठी त्यांना मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.

Published On - 11:25 am, Mon, 18 March 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI