स्मृतीजी, संसदेत येण्याच्या इच्छेमुळे हिंदीत भाषण करतो : खडसे

एकनाथ खडसेंनी आपल्या भाषणाला हिंदीतून सुरुवात केली. त्यावेळी स्मृती इराणी यांनी त्यांना मराठीतून बोलण्याची विनंती केली.

स्मृतीजी, संसदेत येण्याच्या इच्छेमुळे हिंदीत भाषण करतो : खडसे
अनिश बेंद्रे

| Edited By: Team Veegam

Oct 16, 2019 | 1:36 PM

जळगाव : मुक्ताईनगरमध्ये रोहिणी खडसे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी मुक्ताईनगरमध्ये सभा घेतली. यावेळी हिंदीतून भाषणाला सुरुवात करणाऱ्या एकनाथ खडसेंना इराणींनी मराठीतून बोलण्याची विनंती केली. त्यावर माझी संसदेत यायची इच्छा होती, म्हणून हिंदीत भाषण करतो, असं खडसे (Eknath Khadse Jalgaon Rally) म्हणताच एकच हशा पिकला.

खडसेंनी आपल्या भाषणाला हिंदीतून सुरुवात केली. त्यावेळी स्मृती इराणी यांनी त्यांना मराठीतून बोलण्याची विनंती केली. मात्र, खडसेंनी ‘मला हिंदीतून भाषण करायला आवडते. मी हिंदी विसरु नये म्हणून कधी कधी हिंदीतून भाषण करतो. माझीही संसदेत यायची मनापासून इच्छा होती’, असं सांगत आपल्या मनातील भावना जाहीरपणे सांगून टाकली.

नाथाभाऊंना पाडण्यासाठी नाही, तर नाथाभाऊंच्या मुलीला पाडण्यासाठी पवारसाहेब इथे आले. चला माझीच इज्जत वाढली, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना यावेळी टोला लगावला.

‘काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, काही आपले लोक सगळेच नाथाभाऊंना पाडण्याचे प्रयत्न करत आहेत. पण पैलवान तेल लावून तयार आहे. माझ्यासमोर पंजा नाही, घड्याळ नाही, पण अपक्ष बंडखोर उभा आहे. त्याला अजून शिवसेनेने काढला नाही. दहा जणांची हकालपट्टी झाली, पण याला काढला नाही. म्हटलं पोरगं आमचं आहे, जाऊदे काय काढताय. नाथाभाऊच्या विरुद्ध उभं आहे. नाथाभाऊंना पाडायला सगळे एकत्र आले आहेत.’ असं एकनाथ खडसे (Eknath Khadse Jalgaon Rally) म्हणाले.

‘गेल्या आठवड्यात शरद पवार स्वतः आले आणि म्हणाले या अपक्षाला आमचा पाठिंबा. वा रे वा राष्ट्रीय नेते. असं असेल तर त्यांना राष्ट्रीय नेते म्हणावं तरी कसं? नाथाभाऊंना पाडण्यासाठी नाही, नाथाभाऊंच्या मुलीला पाडण्यासाठी पवारसाहेब इथे आले. चला माझीच इज्जत वाढली.’ अशा कानपिचक्याही खडसेंनी लागवल्या.

माझ्या मुलीला पाडायला खुद्द पवार आले, माझीच प्रतिष्ठा वाढली : खडसे

‘नरेंद्रभाई मोदींसारखा पंतप्रधान आपल्याला पाहायला मिळाला. एका चहावाल्याला, एका टपरीवर काम करणाऱ्याला, एका गरीब कुटुंबातील मुलाला, दामोदरदास मोदी यांच्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या पोटी जन्माला आलेल्या एका मुलाला पंतप्रधानपद मिळतं. आणि आम्हाला आत्मविश्वास वाटला, आपण का नाही होऊ शकत पंतप्रधान? होणार-न होणार ही गोष्ट वेगळी, पण जनतेच्या मनात एक विश्वास निर्माण झाला की गरीबांच्या व्यथा जाणणारा. गरीबांच्या घरात वाढलेला एक पंतप्रधान या देशाला मिळू शकतो’ अशा शब्दात खडसेंनी मोदींवर स्तुतिसुमनं उधळली.

जळगावातील मुक्ताईनगर मतदारसंघातून एकनाथ खडसे यांचा पत्ता कापत भाजपने त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली. त्यांच्याविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादीचा उमेदवार नाही. परंतु नाराज झालेले शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध सर्वपक्षीय अशी रंगतदार लढत होणार आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें