शिंदेंच्या शिवसेनेचा आता अजितदादांच्या अर्थखात्यावर वॉच? त्या 2800 कोटींवर विशेष लक्ष!

निधीवाटपावरून शिंदे यांचे मंत्री, आमदार नेहमी तक्रार करतात. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना मोठा आदेश दिल्याचे बोलले जात आहे.

शिंदेंच्या शिवसेनेचा आता अजितदादांच्या अर्थखात्यावर वॉच? त्या 2800 कोटींवर विशेष लक्ष!
| Updated on: Jun 24, 2025 | 6:47 PM

Eknath Shinde Vs Ajit Pawar : सध्या राज्यात महायुतीचे सरकार आहे. महायुतीच्या माध्यमातून तीन पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली असली तरी या तिन्ही पक्षांमध्ये धुसफूस चालूच असते. वेगवेगळ्या कारणांमुळे महायुतीतील नेते एकमेकांवर टीका करताना दिसतात. अजित पवार यांच्यावर तर शिंदे गटातील मंत्री, आमदारांची विशेष नाराजी आहे. आम्हाला निधी मिळत नाही. कामं कशी करणार? असा सवाल शिंदे यांच्या आमदार, मंत्र्यांकडून वेळोवेळी उपस्थित करण्यात आलेला आहे. असे असतानाच आता मंत्रालयतील सहाव्या मजल्यावर मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवार यांच्या अर्थखात्याकडे आता शिंदे यांच्या शिवसेनेचा वॉच असणार आहे. तसा आदेशच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना दिला आहे.

मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर नेमकं काय घडलं?

सूत्रांच्या माहितीनुसार मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील मंत्र्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी एकनाथ शिंदे हेदेखील उपस्थित होते. या बैठकीत निधी वाटपावरून उपमुख्यंत्री अजित पवार यांच्या अर्थखात्यावर शिंदेंच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर अजित पवार यांच्याकडे असलेल्या अर्थखात्यावर बारकाईनं लक्ष ठेवा, असा आदेश एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मंत्र्यांना दिला आहे. तशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

अजित पवारांच्या खात्यावर लक्ष ठेवण्याचा आदेश

अजित पवार यांच्या खात्यात सध्या 1400-1400 कोटी रुपयांचे दोन निधी आहेत. या निधीकडे लक्ष ठेवलं पाहिजे. हा निधी कुठे वितरीत होत आहे, त्याची माहिती आपल्याला मिळाली पाहिजे, अशी भूमिका या बैठकीत घेण्यात आली. जे आपल्या हक्काचं आहे, ते घेतलंच पाहिजे, असा आक्रमक पवित्रा एकनाथ शिंदे यांनी घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

अजितदादांच्या खात्यावर शिवसेनेचा वॉच असणार का?

एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या अर्थखात्यावर नजर ठेवा, असं आपल्या मंत्र्यांना सांगितल्यामुळे एकाप्रकारे शिवसेनेचा अजित पवारांच्या अर्थखात्यावर वॉच असणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिंदे यांच्या मंत्र्यांच्या बैठकीत झालेल्या या खलबतांवर अजित पवार तसेच त्यांचा पक्ष काय भूमिका घेणार? हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.