महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर होण्याआधी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा झटका, यवतमाळमध्ये नेमकं काय घडलं?

| Updated on: Apr 28, 2023 | 8:28 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला यवतमाळमध्ये झटका बसला आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने चांगलीच बाजी मारली आहे. यवतमाळमध्ये मंत्री संजय राठोड यांचा चांगला दबदबा आहे. असं असताना ठाकरे गटाने आज चांगलं यश संपादीत केलं आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर होण्याआधी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा झटका, यवतमाळमध्ये नेमकं काय घडलं?
Follow us on

यवतमाळ : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा सुप्रीम कोर्टातील निकाल कधीही जाहीर होऊ शकतो. या निकालात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलासा मिळतो की ठाकरे गटाला दिलासा मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणाबाबत विविध चर्चांना उधाण आलं आहे. असं असताना या निकालाआधीच ठाकरे गटाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा झटका दिला आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यवतमाळमध्ये दिग्रस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आपल्या पक्षाचे नेते संजय देशमुख यांच्यावर मोठी जबाबदारी दिली होती. ती जबाबदारी चोखपणे पार पाडण्यात देशमुखांना यश आलं आहे.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकींचा धुराळा उडाला. या निवडणुकीचे निकाल आता समोर येऊ लागले आहेत. राज्यातील 253 कृषी उत्पन्न बाजार समितींपैकी 18 ठिकाणी बिनविरोध निवड झाल्याचं आधीच स्पष्ट झालेलं. तर उर्वरित 235 कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणुकींचा धुराळा उडातोय. यापैकी 147 बाजार समित्यांच्या निवडणुकीचा धुराळा आज उडाला. यापैकी 37 बाजार समितींच्या निवडणुकीचा निकाल आज समोर येतोय.

मंत्री संजय राठोड यांना मोठा धक्का

कृषी उत्पन्न बाजार समितीत कोण निवडून येतं किंवा कोणाचं वर्चस्व राहतं, हा मुद्दा महत्त्वाचा मानला जातो. कारण जो निवडणूक जिंकतो त्याचं स्थानिक पातळीवरील राजकारणात दबदबा मानला जातो. त्यामुळे ही निवडणूक प्रत्येक पक्षासाठी महत्त्वाची मानली जाते. तसेच प्रत्येक पक्ष या निवडणुकीसाठी कंबर कसतं.

हे सुद्धा वाचा

राज्यात आज वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितींचा निकाल आता समोर येत आहे. या निकालात यवतमाळमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. विशेषत: मंत्री संजय राठोड यांना मोठा धक्का बसलाय. तर ठाकरे गटाने या ठिकाणी मुसंडी मारली आहे.

नेमका निकाल काय?

यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मंत्री संजय राठोड यांना मोठा धक्का बसला आहे. दिग्रस बाजार समितीवर महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. मविआ नेते संजय देशमुख, माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन महाविकास आघाडीला 18 पैकी 14 जागी विजयी मिळाला आहे. या निवडणुकीत फक्त 4 जागी संजय राठोड गटाचे संचालक निवडून आले आहेत. हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे संजय देशमुख यांचा मोठा विजय मानला जातोय. आता या निकालावर मंत्री संजय राठोड काय भूमिका मांडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.