महापौर पदासाठी भाजपमध्ये रस्सीखेच, घोडेबाजाराच्या भीतीने भाजप नगरसेवक गोव्याला

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर पदावर आपल्याच गटातील उमेदवार नियुक्त झाला पाहिजे यासाठी भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता आणि वर्तमान आमदार गीता जैन या दोन गटात रस्सीखेच सुरू आहे.

  • रमेश शर्मा, टीव्ही 9 मराठी, ठाणे
  • Published On - 22:40 PM, 21 Feb 2020

ठाणे : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी बुधवार (26 फेब्रुवारी) निवडणूक होत आहे. या पदावर कोणत्याही परिस्थितीत आपल्याच गटातील उमेदवार नियुक्त झाला पाहिजे यासाठी भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता आणि वर्तमान आमदार गीता जैन या दोन गटात रस्सीखेच सुरू आहे (Mira Bhayandar Mayor election). निवडणूकीत घोडेबाजार होऊ नये यासाठी भाजप आपल्या सर्व नगरसेवकांना गोव्याला पाठवत आहे.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या विद्यमान महापौर डिंपल मेहता यांची मुदत 28 फेब्रुवारीला संपत आहे. यंदाचे महापौर पद अनुसुचित जातीसाठी आरक्षित आहे. पुढील अडीच वर्षांसाठी आपल्याच गटातील उमेदवार नियुक्त झाला पाहिजे. यासाठी भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता आणि भाजपच्या आमदार आणि नगरसेविका गीता जैन यांनी आपली ताकद लावली आहे.

भाजपकडून ज्योत्स्ना हसनाळे, रुपाली शिंदे, दौलत गजरे यांची नावे चर्चेत होती. मात्र दोन दिवसांपासून गीता जैन समर्थक निला सोन्स रिंगणात उतरणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मेहता यांच्या गटातील बहुसंख्य नगरसेवक ज्योत्स्ना हसनाळे यांना महापौर होण्याची संधी द्यावी यासाठी आग्रही आहेत. मात्र हसनाळे यांची निवड झाल्यास “नाका पेक्षा मोती जड” अशी आपली अवस्था होईल, अशी भीती मेहता यांना आहे. त्यामुळे मेहता यांच्या निकटवर्तीय रुपाली शिंदे यांचं नाव चर्चेत आहे.

एकूणच महापौर पदावरुन भाजपामध्ये मोठया प्रमाणात अंतर्गत असंतोष खदखदत आहे. दुसरीकडे निला सोन्स यांनी आपलं नाव पुढं आणल्यामुळे भाजपचे काही नगरसेवक गीता जैन यांच्या माध्यमातून त्यांच्या पाठीशी उभे राहतील असं चित्र दिसत आहे.

मीरा भाईंदर महानगरपालिकेत भाजप 61, शिवसेना 22 काँग्रेस 12 असे संख्याबळ आहे. महापौर पदासाठी 48 ची मॅजिक फिगर लागणार आहे. भाजपमधील 14 नगरसेवक गीता जैन यांच्या पाठीशी असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे निवडणूक चुरशीची झाली आहे. शिवसेनेकडून या पदासाठी एकमात्र अनंत शिर्के पात्र आहेत. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी महापौर निवडणुकीत चमत्कार घडवणार असा दावा केला आहे.

मीरा भाईंदर महानगर पालिकेत मेहता समर्थक भाजपच्या महापौर बनणार हे निश्चित आहेत. परंतू भाजपशी नाराज गीता जैन, शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आले तर गीता जैन समर्थक किंवा शिवसेनेच्या महापौर होऊ शकतात.

संख्याबळ

भाजप 61 नगरसेवक
शिवसेना 22 नगरसेवक
काँग्रेस 12 नगरसेवक

जादुई आकडा 48

संख्याबळावरुन भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या समर्थक महापौर होतील असं निश्चित मानलं जात आहे. मात्र, काही चमत्कार घडला तर ही स्थिती बदलू शकते. आमदार गीता जैन समर्थक 14 नगरसेवक यांना शिवसेनेच्या 22 आणि काँग्रेसच्या 12 नगसेवकांचा पाठिंबा मिळाल्यास त्या 48 चा जादुई आकडा मिळवू शकतात. या राजकीय शक्यतांच्या पार्श्वभूमीवर कोण बाजी मारतं आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

संबंधित व्हिडीओ:


Mira Bhayandar Mayor election