Priya Berde joins NCP | पवारांच्या कार्याने प्रभावित, अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

| Updated on: Jul 07, 2020 | 4:00 PM

"विधान परिषद वगैरे डोक्यात नाही. मला तळागाळात काम करायचे आहे. लोक कलावंत यांच्या समस्या जाणून घ्यायच्या आहेत. पक्षश्रेष्ठी यांनी विचार केला, तर बघू" असं प्रिया बेर्डे म्हणाल्या.

Priya Berde joins NCP | पवारांच्या कार्याने प्रभावित, अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
Follow us on

पिंपरी चिंचवड : प्रख्यात अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. पुण्यात प्रिया बेर्डे यांच्यासह अनेक कलाकार, तंत्रज्ञ यांचा पक्षप्रवेश झाला. महिला कलाकार, लोक कलावंत, तंत्रज्ञ यांच्यासाठी काम करण्याचा मानस यावेळी प्रिया बेर्डे यांनी व्यक्त केला. शरद पवारांच्या कार्याने प्रभावित होऊन राष्ट्रवादीची निवड केल्याचं त्या म्हणाल्या. (Film Actress Priya Berde joins NCP in presence of Supriya Sule)

“आपल्या कलाकारांसाठी मला काम करायचे आहे. राजकारणात प्रवेशासाठी राष्ट्रवादीची निवड का केली, असा प्रश्न मला विचारला जातो. तर शरद पवार साहेबांना कलेची जाण आहे. त्यांना कलाकारांविषयी आदर आहे. त्यांची सांस्कृतिक जाण आम्हा कलाकारांना माहित आहे. लॉकडाऊनच्या काळात लोक कलावंत आणि तंत्रज्ञ यांना मोठी मदत राष्ट्रवादीने केली. राष्ट्रवादी काँग्रेसचेने 3 हजार लोक कलावंतांना प्रत्येकी 3000 रुपये मानधन दिले. नाट्य-चित्रपट क्षेत्रातही अनेक निर्माते दिग्दर्शक यांनी मदत केली आहे, तीही कोणताच गवगवा न करता.” असं प्रिया बेर्डे म्हणाल्या.

“मला आपल्या कलाकार तंत्रज्ञ यांच्याविषयी तळमळ वाटते. राष्ट्रवादीसारख्या पक्षाचे पाठबळ मिळत असेल, तर नक्कीच चांगलं काम करु शकेन. मी स्वतःला नेता म्हणणार नाही. कारण आम्ही सगळे जण एकत्र काम करणार आहोत. अभिनय सुरुच राहील, निर्माती म्हणूनही काम करत आहे, ते चालू ठेवेन” असं प्रिया बेर्डे यांनी सांगितलं.

हेही वाचा : अभिनेत्री प्रिया बेर्डेंसह कलाकारांची फौज राष्ट्रवादीत, रुपाली चाकणकर म्हणतात….

“विधान परिषद वगैरे डोक्यात नाही. मला तळागाळात काम करायचे आहे. तालुके जिल्ह्यातून फिरायचे आहे. लोक कलावंत यांच्या समस्या जाणून घ्यायच्या आहेत. पक्षश्रेष्ठी यांनी विचार केला, तर बघू” असं प्रिया बेर्डे म्हणाल्या.

प्रिया बेर्डे यांच्या मागण्या

राज्य शासनाच्या जाहिरातीमध्ये मराठी कलाकारांना स्थान द्यावे
ज्येष्ठ कलावंताच्या मानधनात वाढ करावी
मालिकांची प्रत्येक शिफ्ट आठ तासांचीच असावी
मालिका कलाकारांना 90 ऐवजी तीस दिवसात मानधन मिळावे

दरम्यान, लक्ष्मीकांत बेर्डे जाऊन 16 वर्ष झाले परंतु ते आजही आमच्या मनात आहेत. त्यांचे कार्य आपण चांगल्या पद्धतीने पुढे नेत आहात, अशा भावना यावेळी सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या.


राष्ट्रवादीत कोणाकोणाचा प्रवेश?

1) प्रिया बेर्डे, अभिनेत्री
2) राजेश सरकटे, गायक
3) सुधीर निकम, लेखक-दिग्दर्शक
4) माया जाधव, लावणी कलावंत
5) सुहासिनी देशपांडे, अभिनेत्री
6) शंकुतला नगरकर, लावणी कलावंत
7) सिध्देश्वर झाडबुके, अभिनेता
8) विनोद खेडकर, अभिनेता
9) संतोष साखरे, कार्यकारी निर्माता
10) मिलिंद अष्टेकर, अ. भा. मराठी चित्रपट महामंडळ, कोल्हापूरचे माजी उपाध्यक्ष
11) आशू वाडेकर, अभिनेता
12) संग्राम सरदेशमुख, अभिनेता
13) उमेश दामले, अभिनेते
14) संजय डोळे, लेखक-दिग्दर्शक
15) ओंकार केळकर, संगीतकार
16) अर्चना नेवरेकर

प्रिया बेर्डे यांची राष्ट्रवादीच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाच्या पुणे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती होणार आहे. त्या सध्या पुण्यातच असून लक्ष्मीकांत बेर्डे फाऊंडेशनचा कारभार चालवत आहेत. त्यामुळे त्यातूनच त्या नव्या कामाला सुरुवात करणार असल्याचे सांगितले जात आहे. (Film Actress Priya Berde joins NCP in presence of Supriya Sule)