रिक्षाचालक ते नगरविकास मंत्री; वाचा, ‘ठाणे’दार एकनाथ शिंदेंचा प्रवास

आपल्या राज्यात अनेक यशस्वी राजकारणी आहेत. त्या प्रत्येकालाच घरातून राजकारणाचं बाळकडू मिळालेलं नाही. (From driver to Urban Development Minister, Know About Eknath Shinde)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:45 PM, 18 Apr 2021
रिक्षाचालक ते नगरविकास मंत्री; वाचा, 'ठाणे'दार एकनाथ शिंदेंचा प्रवास
eknath shinde

मुंबई: आपल्या राज्यात अनेक यशस्वी राजकारणी आहेत. त्या प्रत्येकालाच घरातून राजकारणाचं बाळकडू मिळालेलं नाही. अनेकजण कठोर संघर्ष करून राजकारणात आले आहेत. काही नेते तर अपघातानेच राजकारणात आले आहेत. राजकारणात मंत्रीपदापर्यंत मजल मारू असं त्यांना कधी वाटलं नसेल. पण कर्तृत्व आणि मेहनतीच्या बळावर त्यांनी राजकारणात आपलं स्थान पक्क केलं आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे त्यापैकीच एक. रिक्षाचालक ते नगरविकास मंत्री हा त्यांचा प्रवास नुसातच थक्क करणारा नाही, तर अनेकांना प्रेरणा देणारा आहे. (From driver to Urban Development Minister, Know About Eknath Shinde)

सातारा ते ठाणे

साताऱ्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दरे हे एकनाथ शिंदे यांचं गाव. ते शिक्षणासाठी ठाण्यात आले होते. गरीबीमुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावं लागलं होतं. त्यानंतर त्यांनी एका मासळी विकणाऱ्या कंपनीत सुपरवाझर म्हणून काम केलं. पण त्यातून मिळकत होत नव्हती. म्हणून शिंदे यांनी रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. याचवेळी ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्यातील शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांच्या संपर्कात आले. तेव्हा त्यांचं वय होतं 18 वर्ष. वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी त्यांनी शिवसेनेतून राजकीय श्रीगणेशा केला. शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात सहभाग घेतला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा आंदोलनात त्यांनी पोलिसांचा लाठीमारही खाल्ला. मितभाषी, संयमी, पण आंदोलनात आक्रमक असलेल्या एकनाथ शिंदेंवर आनंद दिघेंची कृपा झाली आणि शिंदे ठाण्यातील किसन नगरचे शाखाप्रमुख झाले.

1997

शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात फ्रंटवर असलेल्या एकनाथ शिंदेंना 1997 हे वर्ष अत्यंत लकी ठरलं. 1997मध्ये त्यांना आनंद दिघेंनी ठाणे महापालिका निवडणुकीचं तिकीट दिलं. या निवडणुकीत शिंदे घवघवीत मतांनी विजयी झाले. त्यानंतर ते ठाणे महापालिकेचे सभागृह नेतेही झाले. सभागृह नेते म्हणून पालिका गाजवल्यानंतर 2004मध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. पहिल्याच विधानसभा निवडणुकीत ते निवडून आले. 2004 पासून सलग चार वेळा ते कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून आमदारपदी निवडून आलेले आहेत. त्यानंतर 2014मध्ये शिवसेना विरोधी पक्षात बसणार होती. तेव्हा 12 दिवसांसाठी ते गटनेते झाले होते. त्यानंतर शिवसेना सत्तेत गेल्यानंतर ते मंत्रीही झाले. शिंदे यांनी या आधी २०१५ ते २०१९ पर्यंत सार्वजनिक बांधकाम या खात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले. 2019मध्ये ते कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. सध्या ते ठाकरे सरकारमध्ये नगरविकास मंत्री आहेत.

मितभाषी नेता, कडवट शिवसैनिक

नम्र, मितभाषी, कडवट शिवसैनिक, जोडतोडीच्या राजकारणाचं कौशल्य या एकनाथ शिंदेंच्या जमेच्या बाजू आहेत. 2014 च्या मोदी लाटेतही शिंदेंनी ठाण्यात शिवसेनेची पडझड होऊ दिली नाही. कार्यकर्त्यांचं गाऱ्हाणं ऐकून घेण्याची क्षमता आणि ‘मास बेस’ असलेला नेता म्हणून शिंदेची ओळख आहे. आनंदराव दिघेंनंतर ठाण्यात शिवसेना टिकवण्यामागे शिंदेंचं योगदान मोठं आहे. ठाणे पालिका, जिल्हापरिषदा, अंबरनाथ नगरपरिषद, कल्याण-डोंबिवली पालिका, बदलापूर नगरपरिषदेपासून ते नाशिकपर्यंत शिंदे यांनी शिवसेनेचं जाळं विणलं आहे. ठाण्यापासून नाशिकपर्यंत शिंदेंचा शब्द प्रमाण मानला जातो.

56व्या वर्षी पदवीधर

एकनाथ शिंदे यांना गरीबीमुळे शिक्षण अर्धवट सोडावं लागलं होतं. केवळ इयत्ता दहावीपर्यंतच ते शिकले. त्याचं शल्य त्यांना नेहमीच बोचत होतं. त्यामुळे त्यांनी वयाच्या 56 व्या वर्षी पदवी परीक्षा पास होऊन शिक्षणाला वयाची अट नसते हे दाखवून दिले आहे. शिंदे यांनी पदवी परीक्षेत 77.25 टक्के गुण घेऊन घवघवीत यश मिळविले आहे. ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयातून त्यांनी पदवी परीक्षा दिली आहे. वयाच्या 56व्या वर्षी पदवीधर होणारे ते राज्यातील बहुदा पहिलेच मंत्री असण्याची शक्यता आहे. अर्धवट शिक्षण पूर्ण करून त्यांनी एक प्रकारचं अपूर्ण रिंगण पूर्ण केलं आहे. त्यांचं शिक्षण कमी झालं असलं तरी त्यांनी त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांना डॉक्टर बनवलं. श्रीकांत हे कल्याण विधानसभा मतदारसंघातील खासदारही आहेत. (From driver to Urban Development Minister, Know About Eknath Shinde)

एकनाथ शिंदे यांची माहिती

मतदारसंघ : कोपरी-पाचपाखडी (ठाणे)
पक्ष – शिवसेना
शिक्षण – पदवी
संपत्ती – एकूण 14 कोटी
कुटुंब – पत्नी लता शिंदे, मुलगा श्रीकांत शिंदे (From driver to Urban Development Minister, Know About Eknath Shinde)

 

संबंधित बातम्या:

पहाटेच्या शपथविधीतून थेट पवारांना भेटले, पाचवेळा आमदार, चौथ्यांदा मंत्री; वाचा, कोण आहेत राजेंद्र शिंगणे

संघर्षशील नेता, कामगारांचा बुलंद आवाज; वाचा, कोण आहेत भाई जगताप?

नेता, अभिनेता, ‘एकच छंद गोपीचंद’; वाचा, कोण आहेत गोपीचंद पडळकर?

(From driver to Urban Development Minister, Know About Eknath Shinde)