गुजरातमधील शाळांच्या हजेरीत ‘येस सर’ नाही, ‘जय हिंद’!

गुजरातमधील शाळांच्या हजेरीत 'येस सर' नाही, 'जय हिंद'!

अहमदाबाद : मध्य प्रदेशनंतर आता गुजरातमधील शाळांमध्ये ‘जय हिंद’ आणि ‘जय भारत’ या घोषणांचा नाद घुमणार आहे. कारण गुजरातमधील शाळांमध्येही आता हजेरीदरम्यान ‘येस सर’ किंवा ‘प्रेझेंट सर’ असे न म्हणता, विद्यार्थ्यांना ‘जय हिंद’ किंवा ‘जय भारत’ बोलावे लागणार आहे.

पहिली ते बारावी या इयत्तांसाठी गुजरात सरकारच्या शिक्षण विभागाने यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच देशभक्तीची भावना जागृत करण्याच्या उद्देशाने शिक्षण खात्याने हे पाऊल उचलले आहे. 31 डिसेंबर 2018 रोजी झालेल्या शिक्षण विभागाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्तामोर्तब झाला आणि तसा सूचना सर्व शाळांना देण्यात आल्या.

विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत व्हावी, यासाठी हे पाऊल उचलल्याचे गुजरात राज्याचे शिक्षणमंत्री भूपेंद्रसिंह चुडासमा यांनी सांगितले. एक जानेवारीपासून म्हणजे नव्या वर्षापासून पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आता हजेरीदरम्यान ‘जय भारत’ किंवा ‘जय हिंद’ म्हणावे लागणार आहे.

15 मे 2018 रोजी मध्य प्रदेश सरकारच्या शिक्षण विभागाने सुद्धा अशा प्रकारच्या सूचना सर्व शाळांना दिल्या होत्या. त्यानंतर मध्य प्रदेशात निर्णयाची अंमलबाजवणी सुद्धा झाली होती. मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातल्या शाळांमध्ये पहिल्यांदा हजेरीदरम्यान ‘जय हिंद’ बोलण्यास सुरुवात झाली होती.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI