
Gunratna Sadavarte On Raj Thackeray Protest : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी भाषेच्या सक्तीचा कडाडून विरोध केला आहे. काहीही झालं तरी आम्ही सरकारला इयत्ता पाहिलीपासून हिंदी भाषा विषय शिकवू देणार नाही, अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे. विशेष म्हणजे सरकारच्या हिंदी भाषेच्या धोरणाला विरोध दर्शवण्यासाठी मनसेचे 5 जुलै रोजी मोर्चाचेही आयोजन केले आहे. पण याच मोर्चाला मात्र अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध केला आहे. राज ठाकरे यांच्या कायद्याप्रमाणे मुसक्या आवळल्या पाहिजे, अशी मोठी मागणी सदावर्ते यांनी केली आहे.
राज ठाकरे हे शिक्षणाच्या आड येत असून ते अक्षम्य आहे. हा विरोध म्हणजे सरस्वती आईच्या विचारांना विरोध करण्यासारखे आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार हे त्रिभाषा सूत्र आलेले आहे.अगोदर बोलतात हिंदी भाषा नको. आता बोलतात हिंदी भाषा सक्ती नको. हा विरोध कशासाठी केला जातोय? असा सवाल सदावर्ते यांनी राज ठाकरे यांना केला.
तसेच सदावर्ते यांनी मनसेच्या मोर्चाला परवानगीच मिळालेली नाही, असा दावा केला आहे. मोर्चा काढण्याची जागा ही आझाद मैदान आहे. गिरगाव चौपाटी नाही. कायदा आणि सुव्यवस्थेत अडचण निर्माण करण्याची ही भानगड आहे, असा आरोप सदावर्ते यांनी केला.
न्यायालयाने ठरवून दिलेल्या जागेतच मोर्चे काढायचे असतात. आम्ही मनोज जरांगे यांच्या मोर्चालाही विरोध केला होता, अशी आठवणही सदावर्ते यांनी सांगितली. तसेच राज ठाकरे यांच्या मोर्चासंदर्भात आम्ही पोलीस तसेच शिक्षणमंत्री दादा भुसे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनादेखील पत्र दिले आहे, अशी माहितीही त्यांनी दिलीय.
मोर्चाच्या माध्यमातून काहीतरी घडवण्याचा हा प्रकार आहे. भाषेच्या नावावर सांप्रदायिकतेच्या नावाखाली वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. राज ठाकरे मोर्चा कढू शकत नाहीत. त्यांना मोर्चा काढण्यासाठी परवानगीच दिलेली नाही, असा थेट दावा सदावर्ते यांनी केला आहे. तसेच राज ठाकरे यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई झाली पाहिजे. कायद्याप्रमाणे त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत, अशी मागणी सदावर्ते यांनी केली आहे. राज ठाकरे यांना किंमत देण्याची गरज नाही, असा हल्लाबोलही सदावर्ते यांनी केलाय.
दरम्यान, आता सदावर्ते यांच्या भूमिकेनंतर पोलीस, राज्य सरकार काही कारवाई करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.