
राज्यातील सर्वच राजकीय पक्ष नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि महाविकास आघाडीची युती होणार असल्याची चर्चा रंगली आहे. नाशिकमध्ये स्थानिक पातळीवर आगामी निवडणुका महाविकास आघाडी मनसेला घेऊन लढणार असल्याचे महाविकास आघाडी आणि मनसेच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र राज्यात ही युती होणार की नाही याबाबत अद्याप ठरलेले नाही. अशातच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मनसेसोबतच्या युतीवर भाष्य केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
बुलढाणा येथे हर्षवर्धन सपकाळ यांना पत्रकारांनी मनसेला महाविकास आघाडीत घ्यायचं की नाही याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना सपकाळ म्हणाले की, ‘इंडिया अलायन्स राष्ट्रीय स्तरावर आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून आसाम-नागालँडपर्यंत आमची युती आहे. त्यामुळे मनसेकडून युतीचा प्रस्ताव आला तर इंडिया अलायन्सचे नेते राष्ट्रीय स्तरावर बसून याबाबत निर्णय घेतील.’
नाशिकमधील मनसे आणि महायुतीच्या बैठकीबाबत बोलताना सपकाळ म्हणाले की, ‘त्या बैठकीला काँग्रेसचा कुणी प्रतिनिधी गेला असेल तर साफ चूक आहे. कोणताही प्रतिनिधी पक्षाने पाठवलेला नाही. जो गेला तो कोणत्या उद्देशाने गेला माहिती नाही. जो प्रतिनिधी गेला त्याला पक्षाच्या वतीने नोटीस देण्यात आली असून त्या संदर्भात खुलासा मागितला आहे.’
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार असं विधान केले होते. यावर बोलताना सपकाळ म्हणाले की, अनेक नेत्यांची, कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची इच्छा आहे. त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली आहे . अद्याप मुंबई महापालिकेची निवडणूक लागलेली नाही. एकदा घोषणा झाली की पक्ष त्यावर निर्णय घेईन.
पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप झाले आहेत. याबाबत बोलताना सपकाळ म्हणाले की, त्यांना पूर्णपणे वाचवण्याचा प्रयत्न आहे. अजित पवार यांनी तात्काळ राजीनामा द्यायला हवा. देवेंद्र फडणवीस पॅटन सुरू आहे. चुकी करा, चूक समोर आली की ठराव घ्या. व्यवहार रद्द करा असं सगळीकडे सुरू आहे.