कृषीमंत्रीपद राहणार की जाणार?, अब्दुल सत्तार यांनी एका वाक्यात विषयच संपवला; म्हणाले, मी पक्का…
मंगळवारी मी पत्रकार परिषद घेणार आहे. त्यात राज्याबद्दल बोलेन. लोकं डोळे झाकून बसत नाहीत. कोण चुकीचे स्टेटमेंट काढतंय हे सर्वांना माहीत असतं, असंही अजित पवार म्हणाले होते.

औरंगाबाद: राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरले. त्यामुळे सत्तार प्रचंड अडचणीत आले. राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तार यांच्या विधानाचा निषेध नोंदवत जोरदार आंदोलन केलं. राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या मुंबई आणि औरंगाबादमधील घरावर दगडफेक करून आपला संताप व्यक्त केला. तसेच सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणीही केली. शिवसेना आणि काँग्रेसनेही सत्तार यांच्या विधानाचा निषेध नोंदवून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यामुळे सत्तार मंत्रिमंडळात राहणार की जाणार? असा सवाल केला जात असतानाच सत्तार यांनी मोठं विधान केलं आहे.
अब्दुल सत्तार यांनी औरंगाबादमध्ये जनतेशी संबोधित करताना मोठं विधान केलं आहे. कुणी कितीही प्रयत्न केला. माझ्या कितीही राजीनाम्याची मागणी केली तरी मी दोन वर्ष दोन महिने पक्का कृषी मंत्री म्हणून काम करणार आहे, असं सूचक विधान अब्दुल सत्तार यांनी केलं आहे.
अब्दुल सत्तारांच कृषिमंत्री पद कायमच असेल. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. उलट नागरिकांनी कृषी विभागाचा लाभ घ्यावा. मी दोन वर्ष आणि दोन महिने पक्का कृषी मंत्री असणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अब्दुल सत्तार यांना कालच झापलं होतं. आपल्या वडीलधाऱ्यांनी आपल्याला खालच्या पातळीवर टीका करण्याचं शिकवलं नाही. ते आपले संस्कार नाहीत. आपली संस्कृती नाही. महाराष्ट्राची परंपरा नाही. त्यामुळे कोणत्याच पक्षाच्या नेते आणि प्रवक्त्यांकडून कोणतीही आक्षेपार्ह विधाने होऊ नयेत, अशा शब्दात अजित पवार यांनी सत्तार यांचे नाव न घेता कान टोचले होते.
मंगळवारी मी पत्रकार परिषद घेणार आहे. त्यात राज्याबद्दल बोलेन. लोकं डोळे झाकून बसत नाहीत. कोण चुकीचे स्टेटमेंट काढतंय हे सर्वांना माहीत असतं, असंही अजित पवार म्हणाले होते. दरम्यान, सर्वच बाजूने हल्लाबोल झाल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी आपल्या विधानावर माफी मागितली होती.
अब्दुल सत्तार यांच्यावतीने मंत्री दीपक केसरकर आणि शंभुराज देसाई यांनीही दिलगिरी व्यक्त केली होती. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विधानावरून सत्तार यांना फटकारलं होतं.
