आमदारांनी पक्ष सोडू नये म्हणूनच फडणवीसांना सरकार पडणार हे सांगावं लागतं; जयंत पाटलांचा टोला

| Updated on: Nov 12, 2020 | 3:47 PM

पुण्यात बाळासाहेब थोरात आणि मी एकत्र पुण्यातील उमेदवाराचा फॉर्म भरायला जाणार आहोत. | Jayant Patil

आमदारांनी पक्ष सोडू नये म्हणूनच फडणवीसांना सरकार पडणार हे सांगावं लागतं; जयंत पाटलांचा टोला
Follow us on

औरंगाबाद: भाजपच्या आमदारांनी पक्ष सोडू नये म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ‘हे सरकार पडणार’, असे सतत सांगत राहावे लागते, असा टोला राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस यांना आपली माणसं टिकवण्यासाठी सरकार पडणार, असं बोलावं लागतं. आणखी काही काळ ते असंच बोलत राहतील. त्यानंतर फडणवीस यांचं बोलणं आपोआप बंद होईल, असे जयंत पाटील यांनी सांगितले. (Jayant Patil criticized Devendra Fadnavis)

मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जयंत पाटील गुरुवारी औरंगाबादमध्ये आले होते. यानंतर त्यांनी सतीश चव्हाण यांच्या प्रचार कार्यालयाचेही उद्घाटन केले. या कार्यक्रमाला आरोग्य मंत्री राजेश टोपे, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हेदेखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यावेळी जयंत पाटील यांनी नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरुन स्थानिक पातळीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीत निर्माण झालेल्या वादावरही भाष्य केले. हा वाद मिटला आहे. तर पुण्यात बाळासाहेब थोरात आणि मी एकत्र पुण्यातील उमेदवाराचा फॉर्म भरायला जाणार आहोत. काँग्रेसची कुठलीही अडचण होणार नाही. राष्ट्रवादीच्या प्रताप माने यांना आम्ही अर्ज मागे घ्यायला लावू. पुणे पदवीधर मतदारसंघ आतापर्यंत भाजपचा होता. मात्र, आम्ही आता खेडोपाडी फिरुन मतदार नोंदणी केली आहे. त्यामुळे आता कुठलीही अडचण येणार नाही, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

राज्यात पुन्हा निवडणूक घेतल्यास भाजप निवडून येईल : चंद्रकांत पाटील

आम्ही चार वर्षे विरोधात बसण्याची तयारी केली आहे, मात्र हे सरकार काही चार वर्षे चालणार नाही, म्हणजे काय तर ते गुलदस्त्यात आहे, त्यावर भाष्य करायला मी भविष्यकार नाही, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी केले होते.

बिहार निवडणुकीचा परिणाम आता यापुढच्या सर्व निवडणुकांवर होणार आहे. आताही 18 राज्यांमध्ये भाजपचे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे या निकालाचा परिणाम पश्चिम बंगालच नाही, तर यापुढच्या सर्व निवडणुकांवर होणार आहे. तुम्ही कामगार, विद्यार्थी, शेतकरी, महिला अशा 1 हजार जणांचा सर्व्हे करा, त्यातले 900 जण भाजपला मतदान करतो, असे सांगतील, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता.

संबंधित बातम्या:

विधानपरिषद निवडणूक : घोषणा करतावेळीच या उमेदवारांच्या विजयाची जयंत पाटलांना खात्री

विधान परिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक : कोणत्या पक्षाचा उमेदवार कोण?

पदवीधर मतदारसंघात मतदानाचा हक्क कुणाला?; कसा येतो आमदार निवडून?

(Jayant Patil criticized Devendra Fadnavis)