भाजपातून शिवसेनेत गेलेले नगरसेवक खडसे समर्थक, त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश अपेक्षित होता : महाजन

अनिल केऱ्हाळे

| Edited By: |

Updated on: Sep 26, 2021 | 1:22 PM

मुक्ताईनगर आणि बोदवड येथील भाजपच्या 14 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन म्हणाले की, "भारतीय जनता पक्षाला कुठलाही धक्का बसलेला नाही, गेलेले नगरसेवक एकनाथ खडसे यांचे समर्थक होते

भाजपातून शिवसेनेत गेलेले नगरसेवक खडसे समर्थक, त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश अपेक्षित होता : महाजन
Girish Mahajan, Eknath Khadse

जळगाव : बोदवड, मुक्ताईनगर येथील भाजप नगरसेवक शिवसेनेत गेले, ते मुळातच भाजपचे नव्हे तर खडसे समर्थक होते. त्यामुळे हा खडसे यांना खऱ्या अर्थाने धक्का आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे संकटमोचक नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी व्यक्त केली. नगरसेवकांचा शिवसेना प्रवेश हा धक्का आहे, कुणाला हे तुम्ही ओळखून घ्या, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी त्यावेळी दिली होती, मात्र माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनाच हा झटका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

“ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणं अपेक्षित होतं”

मुक्ताईनगर आणि बोदवड येथील भाजपच्या 14 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन म्हणाले की, “भारतीय जनता पक्षाला कुठलाही धक्का बसलेला नाही, गेलेले नगरसेवक एकनाथ खडसे यांचे समर्थक होते. खडसे यांचीच ती माणसं होती, खरं तर ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाणं अपेक्षित होती. मात्र कुणीही राष्ट्रवादीत गेले नाहीत” असा टोला महाजनांनी लगावला.

“खडसेंच्या कोथळी गावात त्यांचा सरपंच नाही”

मुक्ताईनगरात भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष आहे. एकनाथ खडसे यांच्या कोथळी गावात त्यांचा सरपंच नाही. आज बोदवड येथेही तीच परिस्थिती आहे. ते सारखं ‘माझा मतदारसंघ- माझा मतदारसंघ’ करत असतात. मात्र आज त्यांचं तिथे काय आहे? आता निवडणुका होतील त्या वेळी आम्ही दाखवू भाजप तिथे काय आहे ते, असा इशाराही गिरीश महाजन यांनी दिला.

“खडसेंची माणसं शिवसेना पुरस्कृत आमदाराच्या पाठीशी”

गेल्या तीस वर्षांपासून एकनाथ खडसे तिथे भाजपचे आमदार होते, पक्षाने त्यांना मंत्री केले होते. लाल दिव्याची गाडी त्यांना दिली होती, त्यामुळे निवडून आलेली माणसे त्यांची होती. मात्र आता ही माणसे त्यांची राहिलेली नाहीत. शिवसेना पुरस्कृत आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठीशी ते गेलेले आहेत. मात्र येत्या पाच ते सहा महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत आम्ही भारतीय जनता पक्षाचे अस्तित्व दाखवून देणार आहोत, असं महाजनांनी ठणकावून सांगितलं.

काय आहे प्रकरण?

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपचा गड असलेल्या जळगावात पक्षाला मोठे धक्के बसत आहेत. दोनच दिवसांपूर्वी बोदवड नगरपालिकेच्या नगराध्यक्षांसह 11 नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधलं. पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत भाजपच्या 11 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. हे नगरसेवक एकनाथ खडसे समर्थक असूनही राष्ट्रवादीऐवजी सेनेत गेल्यामुळे हा धक्का नेमका कुणाला? अशी चर्चा जळगावच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

जळगावात भाजपच्या नाकावर टिच्चून शिवसेनेचा महापौर

याआधी, जळगाव महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपच्या नाकावर टिच्चून विजय मिळवला होता. या निवडणुकीपूर्वी भाजपच्या 27 नगरसेवकांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे शिवसेनेने अपेक्षेप्रमाणे विजय संपादित केला. त्यामुळे महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांचा विजय झाला.

या निवडणुकीत बहुमतसाठी 38 मतांची गरज होती. जयश्री महाजन यांनी 45 मते मिळाली. तर भाजपच्या प्रतिभा कापसे यांना 28 मते मिळाली. तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार कुलभूषण पाटील यांनी बाजी मारली. शिवसेनेचा हा विजय जळगावमधील गिरीश महाजन यांच्या वर्चस्वाला धक्का मानला गेला.

संबंधित बातम्या :

जळगावच्या बोदवडमधील भाजपच्या 11 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश, पण धक्का नेमका कुणाला?

खडसेंचा करिष्मा! निवडणुकांच्या तोंडावर भाजपला मोठं खिंडार, 18 नगरसेवकांचा कुटुंबासह राष्ट्रवादीत प्रवेश

शिवसेनेचा सर्जिकल स्ट्राईक यशस्वी; जळगावात भाजपच्या नाकावर टिच्चून शिवसेनेचा महापौर

जळगावात भाजपला अजून एक मोठा झटका बसणार? एकनाथ खडसेंच्या दाव्यानं खळबळ

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI