एकनाथ खडसे यांच्या सावलीतही उभा राहणार नाही, ‘या’ आमदाराने बिनविरोध निवडणुकीचा प्रस्ताव धुडकावला

| Updated on: Nov 28, 2022 | 10:53 AM

जळगाव दूध महासंघाची ही निवडणूक एकूण 20 जागांवर लढवली जाणार आहे.

एकनाथ खडसे यांच्या सावलीतही उभा राहणार नाही, या आमदाराने बिनविरोध निवडणुकीचा प्रस्ताव धुडकावला
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

अनिल केऱ्हाळे, जळगावः जळगाव दूध महासंघाच्या (Jalgaon Milk federation Election) निवडणुकीत एकनाथ खडसे (Eknath Khadse) पूर्णपणे घेरले गेले आहेत. मी एकनाथ खडसे यांच्या सावलीतही उभा राहणार नाही, बिनविरोध निवडणुकीचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण (MLA Mangesh Chavan) यांनी घेतली आहे. शिंदे गटाचे गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे याच्याकडून ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते, अशी वक्तव्ये आल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र आमदार मंगेश चव्हाण यांनी या सगळ्या शक्यता धुडकावून लावल्या आहेत.

जळगाव जिल्हा दूध संघाची निवडीसंदर्भात एकनाथ खडसे यांनी पुढाकार घेतला असता तर ही निवडणूक बिनविरोध झाली असती असे मंत्री गुलाबराव पाटील म्हटलं होतं. त्यावर खडसे यांनीही प्रतिक्रिया दिली होती.
मंगेश चव्हाण यांनी वारंवार आम्हाला खडसे परिवार चालत नाही असे भाष्य केले आहे.. त्यांना वेळेवर रोखणे गरजेचे होते, परंतु तसे झाले नाही. असे झाले असते तर नक्कीच ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मी पुढाकार घेतला असता, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली.

त्यानंतर आज आमदार मंगेश चव्हाण यांनी बिनविरोध निवडणुकीची शक्यता साफ फेटाळून लावली. ते म्हणाले, मी एकनाथ खडसेंच्या सावलीत उभा राहणार नाही. च्यावर आपण एवढे आरोप केले त्यांच्यासोबत कसा गेल्यास लोक तोंडात शेण घालतील.. सोयीसाठी राजकारण केल्यास लोकांचा सरकारवरचा विश्वास उडेल.. मी निवडणूक लढवणार खडसे बिनविरोध होणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.
जळगाव दूध महासंघाची निवडणूकीसाठी येत्या 10 डिसेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. उद्या म्हणजेच 29 नोव्हेंबर रोजी अंतिम उमेदवारांची यादी आणि चिन्हवाटप करण्यात येणार आहे. तर 11 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल.

जळगाव दूध महासंघाची ही निवडणूक एकूण 20 जागांवर लढवली जाणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण तसेच शिंदे गटाचे आमदार व मंत्री गुलाबराव पाटील यांनी चांगलीच फील्डींग लावल्यामुळे एकनाथ खडसे यांच्यासमोर मोठं आव्हान उभं ठाकलं आहे.