त्यानं औरंगाबादचा औरंगजेब माझ्या मागे लावून दिलाय… जालन्यात रावसाहेब दानवेंचा अब्दुल सत्तारांवर निशाणा!

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: मंजिरी धर्माधिकारी, Tv9 मराठी

Updated on: Jun 15, 2022 | 2:46 PM

एकमेकांवर शाब्दिक कोट्या आणि मिश्कील शेरेबाजी करण्यात पटाइत असलेल्या अब्दुल सत्तार आणि दानवेंची जोडी मराठवाड्याच्या राजकारणाला चांगलीच परिचित आहे. मात्र अलीकडे शिवसेना-भाजपमधील वैर वाढतेय, तशी यांच्यातील विरोधात्मक टीकाही वाढतायत.

त्यानं औरंगाबादचा औरंगजेब माझ्या मागे लावून दिलाय... जालन्यात रावसाहेब दानवेंचा अब्दुल सत्तारांवर निशाणा!

जालनाः औरंगाबादेत औरंगजेबाच्या कबरीवरून चांगलंच राजकारण तापलेलं असताना रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी औरंगजेबाची (Aaurangzeb) उपमा देत अब्दुल सत्तारांवर चांगलाच निशाणा साधलाय. आज जालना शहरातील पाणी समस्येवर भाजपच्या वतीने मोठा जलाक्रोश मोर्चा काढला. यावेळी जालन्यातील राजकीय विरोधक शिवसेनेचे अर्जून खोतकर आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर दानवेंनी त्यांच्या खास शैलीत टीका केली. थेट समोर येऊन बोलण्याची, टीका करण्याची हिंमत नाही, त्यामुळे त्याने म्हणजेच अर्जून खोतकर यांनी औरंगाबादचा औरंगजेब म्हणजेच अब्दुल सत्तार माझ्या मागे लावून दिले आहेत, असा टोला रावसाहेब दानवेंनी लगावला आहे. रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार हे दोघेही संधी मिळेल त्या व्यासपीठावर एकमेकांवर थेट शब्दात टीका करत असतात. जालन्यातील मोर्चात दानवेंनी ही संधी सोडली नाही.

‘औरंगाबादचा औरंगजेब मागे लावून दिलाय’

जालन्यात भाजपचे रावसाहेब दानवे विरोधात शिवसेनेचे अब्दुल सत्तार आणि अर्जुन खोतकर यांच्यातील शत्रूत्व सर्वपरिचि आहेत .मागील लोकसभा निवडणुकीपासून हे दोघेही रावसाहेब दानवेंवर टीका करत असतात. यावरून बोलताना आज रावसाहेब दानवे म्हणाले, समारोसमोर टीका करण्याची हिंमत नसल्याने त्याने औरंगाबादचा औरंगजेब माझ्या मागे लावून दिला आहे… मी माझ्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात जालन्यासाठी काय काय काम केले याचे फलक लावू शकतो. मात्र काही जण मंत्री असतानाही त्यांनी पाच वर्षात जालन्यासाठी केलेल्या पाच कामांची यादी शोधावी लागते. परंतु समोरासमोर टीका करण्याची हिंमत नसल्याने त्यांनी औरंगबादचा औरंगजेब माझ्या मागे लावून दिला आहे. निवडणूक आल्यानंतर या दोघांनाही मी खिशात घालतो, असा दावा दानवेंनी केला आहे.

राज्यसभा मतदानातही सत्तार-दानवे आमने-सामने

नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीतही अब्दुल सत्तारांनी रावसाहेब दानवेंचे पुत्र संतोष दानवे यांच्यावर आरोप केले होते. दानवे महाविकास आघाडीसाठी मतदान करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तर त्यावर टीका करताना संतोष दानवे यांनीही मतदानानंतर सत्तारांवर टीकास्त्र सोडलं होतं. संजय राऊतांना जर गद्दारांची यादी करायची असेल तर त्यात आधी सत्तारांचं नाव घ्यावं, असं मत संतोष दानवे यांनी व्यक्त केलं होतं.

‘दानवेंचा अर्जुनबाणानी राजकीय वध करेन’

औरंगाबादेत नुकत्याच पार पडलेल्या शिवसेनेच्या स्वाभिमानी सभेत अब्दुल सत्तारांनी दानवेंवर टीका केली होती. रावसाहेब दानवे यांचा अर्जुनाच्या बाणाने राजकीय वध करण्याची संधी मला द्या, असे आवाहन त्यांनी हजारो प्रेक्षकांच्या सभेत केले होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे नेते संजय राऊत, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई तसेच इतर शिवसेनेचे खासदार, आमदार उपस्थित होते.

सत्तार आणि दानवेंतील वैर

एकमेकांवर शाब्दिक कोट्या आणि मिश्कील शेरेबाजी करण्यात पटाइत असलेल्या अब्दुल सत्तार आणि दानवेंची जोडी मराठवाड्याच्या राजकारणाला चांगलीच परिचित आहे. मात्र अलीकडे शिवसेना-भाजपमधील वैर वाढतेय, तशी यांच्यातील विरोधात्मक टीकाही वाढतायत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन काँग्रेसचे आमदार व औरंगाबाद काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवेंच्या विरोधात शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जून खोतकर यांना मैदानात उतरवण्याचे प्रयत्न केले. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्याकडेही गळ घातली होती. पण लोकसभेला शिवसेना-भाजपची युती असल्यामुळे खोतकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून माघार घेतली होती. तेव्हापासून सत्तार यांची रावसाहेब दानवे यांना पराभूत करण्याची इच्छा कायम असल्याचे बोलले जाते. त्यामुळे आगामी लोकसभेत संधी द्या, अर्जुनाच्या बाणाने दानवेंचा राजकीय वधू करू, असं वक्तव्य सत्तारांनी केलं आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI